नगर : वारीत भाविकांचे पथनाट्यातून प्रबोधन | पुढारी

नगर : वारीत भाविकांचे पथनाट्यातून प्रबोधन

निघोज : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळातर्फे विद्यमाने ‘पुणे ते पंढरपूर स्वच्छ वारी – स्वस्थ वारी – निर्मल वारी – हरित वारी – लोकशाही वारी’ या दिंडीचे आयोजन 22 जून ते 10 जुलै दरम्यान करण्यात आले. या प्रबोधन कार्यक्रम, समाजसेवी उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील युवा मंचचे पारनेर तालुका प्रवक्ते प्रतिक वरखडे यांनी दिली.

वारीमार्गावर सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण, मतदान जनजागृती अभियान, पथनाट्याच्या माध्यमातून लेक वाचवा अभियान, चालणारे वारकर्‍यांची हात आणि पायाची मालिश, पोलिस मित्र, अशा विविध विषयांवर काम केले आहे. याबरोबर लोणंद मुक्कामी वारीतील अर्थकारण, उद्योजकता, दिंडीचा इतिहास, वारीतील व्यवस्थापन, महिला सबलीकरण, या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांशी संवाद साधला.

सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव येथील पालखी तळाची सच्छता दिंडीतील विद्यार्थ्यांनी केले. दिंडीत महाराष्ट्रातील आठ विद्यापीठांतील 170 विद्यार्थी सहभागी झाले. दिंडीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, रासेयो संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदींचे मार्गदर्शन लाभले. दिंडीसोबत पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद पारखे, डॉ. विलास कर्डिले, डॉ. राजकुमार रिकामे, डॉ. परमेश्वर पुरी, शालिनी पेखले, वैशाली घुले आदी प्राध्यापक सहभागी झाले.

Back to top button