नगर : जोर्वेत वाळूमाफियांचा खुलेआम सुळसुळाट | पुढारी

नगर : जोर्वेत वाळूमाफियांचा खुलेआम सुळसुळाट

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्याची राजधानी समजल्या जाणार्‍या जोर्वे येथील प्रवरा नदीतून सध्या वाळू माफियांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाळूचा सर्रास उपसा सुरू आहे. हे वाळू माफिया अक्षरक्ष: दिवस-रात्र प्रवरा माईचे लचके तोडत असतानासुद्धा महसूलचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने वाळू माफियांचे मनोधैर्य वाढले आहे.

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात संगमनेर तालुक्यातील प्रवरानदी काठावरील अनेक तरुण या धंद्यात उतरले आहेत. त्यांना ना कुणाचा धाक ना कोणाचेही भय, यामुळे प्रवरा नदी काठावरील जवळजवळ सर्वच गावात प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेषतः संगमनेरच्या पूर्व भागातील जोर्वे या ठिकाणावरून बिनदिक्कतपणे रात्रीच नव्हे तर महसूल कर्मचार्‍यांच्या नाकावर टिच्चून भर दिवसा सूर्य देवाच्या साक्षीने वाळूचा उपसा सुरू आहे.

तलाठ्यांचे सोयिस्कर दुर्लक्ष

या वाळू उपसाकडे स्थानिक महसूलचे तलाठी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने वाळू माफिया बेधुंद झाले आहेत. जोर्वे येथील प्रवरा नदीत वाळू भरल्यानंतर हे वाळूने भरलेले ट्रॅक्टर रहिमपूर, जोर्वे पासून जाणारा कोल्हेवाडी रोड, संगमनेर रोड, कनोली पिंपरणे रोडने भरधाव वेगाने जातात. त्यांना कुणाचीच भीती वाटत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अनेकांना भीती वाटते. सदरच्या रस्त्यावरून दररोज सकाळ सायंकाळ शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र या वरदळीकडे दुर्लक्ष करून हे बेभान चालक वाळूचे ट्रॅक्टर पळवतात. त्यामुळे अपघात होण्याची मोठी भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे.

जोर्वे येथील वाळू तस्करीत अनेक मोठे मासे असल्याची शक्यता वारंवार चर्चिली जात आहे. दिवस-रात्र वाळू तस्करी या भागातून सुरू असल्याने स्थानिक महसूलचा तलाठी व कर्मचारी या वाळू तस्करांना सामील आहे की काय ,अशी शंका या भागातील नागरिक आता एकमेकांना विचारत आहेत.

काय नदी, काय वाळू , काय तलाठी, सगळं ओक्के!

प्रवरा नदीच्या वाळूला सोन्याचा दर मिळतो. त्यामुळे या भागातील वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे येथून वाळू तस्करी करण्यास अनेकांची चढा ओढ सुरू असते. जम बसला तर पैसाच पैसा मिळत असल्याने अनेक जण थोड्या दिवसात लखपती झाल्याचे काही वाळू तस्कर खाजगीत सांगतात. तसेच हा धंदा करताना काहींना मॅनेज करावे लागते असेही सांगून जातात. काही वाळू तस्कर गमतीने म्हणतात की, काय नदी, काय वाळू ,काय तलाठी, सगळे ओक्के हाय, त्यामुळे आम्हाला कुणाची भितीच नाय..!

Back to top button