नगर : ‘...अन्यथा प्रशासनास धडा शिकवू’ | पुढारी

नगर : ‘...अन्यथा प्रशासनास धडा शिकवू’

साकुरी : पुढारी वृत्तसेवा : राहाता शहरात तुंबलेल्या गटारी, उखडलेले रस्ते पाण्याचे साचलेले डबके यामुळे शहरात विविध ठिकाणी दुर्गंधी व डासांचे साम्राज्य पसरलेले असताना सुध्दा नगरपालिका प्रशासन सुस्तावलेल्या अवस्थेत दिसत आहे. साथीचे संसर्गजन्य आजार डोके वर काढत असताना प्रशासन हॉस्पीटल हाऊसफुल्ल होण्याची वाट बघते की काय, असा सवाल उपस्थित करीत प्रशासनाने आरोग्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलली नाही, तर लोकहितासाठी प्रशासनाला सनदशिर मार्गाने धडा शिकवू, असा इशारा राहाता नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक अ‍ॅड.विजय बोरकर यांनी दिला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नगरपरिषदेचे माजी गटनेते अ‍ॅड. बोरकर म्हणाले की, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता शहरातील विकास, आरोग्य तसेच सर्व सामान्य माणसांचे मुलभुत व नागरी प्रश्न केंद्रबिंदू ठेवून या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. त्याकरिता वेळोवेळी नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करुन दिली आहे. असे असताना मात्र प्रशासनाच्या कुचकामी व मनमानीपणामुळे सामान्य जनतेचे नुकसान होत आहे.

राहाता शहरातील मेडिकल हब म्हणून ओळख असलेल्या लोकरुचीनगर येथील महामार्गालगतच्या दोन्ही गटारी मैला मिश्रीत तसेच हॉस्पीटलचे सांडपाणी वाहून जात नसल्याने तुंबले आहे. तुडूंब भरलेल्या गटारींचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्याचे नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभागाला कोणतेही देणेघेणे नसल्याचे दिसत आहे.

या संदर्भात जबाबदार नगरसेवक म्हणून यापुर्वी अनेकदा नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाला या संदर्भात माहिती दिली, परंतू अजून कुठलीही स्वच्छता न केल्याने हा प्रश्न राहाता शहरात विविध ग्रुपवर सोशल मिडीयावरुन सध्या गाजत आहे. भविष्यात तो कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागातील लाखोंची पट्टी कर रुपाने पालिकेला देत असतानासुध्दा येथे जर अशी अवस्था असेल तर शहरात न विचारलेलीच बरी. दरम्यान, लवकरच आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची शहरातील एक शिष्टमंडळ भेट घेणार आहे. नगर परिषदेच्या ढिसाळ कामकाजाबाबत त्यांना माहिती देणार असल्याचे गट नेते नगरसेवक अ‍ॅड. विजय बोरकर यांनी सांगितले.

Back to top button