नगर : संगमनेरात पुन्हा सर्रास गोवंश हत्या | पुढारी

नगर : संगमनेरात पुन्हा सर्रास गोवंश हत्या

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेरच्या अवैध कत्तलखान्यावर संगमनेर शहर पोलिसांनी काल मंगळवारी पहाटे छापा टाकला. सुमारे 500 किलो गोवंशासह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी साहिल ऊर्फ साद मुस्ताक कुरेशी (वय 19) व सलीम मुस्ताक कुरेशी (वय 24) या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

काल पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी कोल्हेवाडी रोडलगत एका अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला. या छाप्यात पाचशे किलो गोवंश मास, चार चाकी वाहने, कुर्‍हाड, दोन चाकू, तीन गाई व एक वासरासह 11 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल दोघांकडून पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी इतर आरोपींचा शोध सुरू आहे. संपूर्ण राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेर येथील अवैध कत्तलखान्यांमध्ये गोवंश हत्या नेहमी केल्या जातात. कारवाईनंतर थोडेफार दिवसांनी पुन्हा गोवंश हत्या सुरू होत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेकदा शहरातील अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी छापे टाकले. अनेकांना अटक केली, तरीही हे कत्तलखाने व गोवंश हत्या बंद होण्याचे नाव घेत नाहीत. या प्रकारामुळे गोप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.

4 गाईंसह वासरांना पोलिसांमुळे जीवदान!

छाप्या नंतर सुमारे एक तासाच्या अंतराने 5.30 च्या सुमारास पोलिसांनी जम-जम कॉलनी येथे मोना प्लॉट शेजारी काटवनातून अज्ञात आरोपींनी कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून ठेवलेल्या चार गाई व एक वासरांची सुटका केली. याप्रकरणीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button