नगर : श्री साकेश्वराचा मुकुट भरदिवसा लांबविला | पुढारी

नगर : श्री साकेश्वराचा मुकुट भरदिवसा लांबविला

साकत : पुढारी वृत्तसेवा : कडभनवाडी येथील ग्रामदैवत असलेल्या श्री साकेश्वर महाराजांचा चांदीचा मुकूट दिवसाढवळ्या चोरीला गेला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे नामदेव कडभने यांनी सांगितले.

श्री साकेश्वर महाराज जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री साकेश्वर महाराजांचे प्रती मंदिर कडभनवाडी ग्रामस्थांनी केलेले आहे. मंदिरात देवाच्या मूर्तीवर चांदीचा मुकुट बसविलेला होता. सोमवारी (दि.4) सकाळी 10 वाजता देवाचे भक्त नामदेव कडभने यांनी मंदिराची स्वच्छता करून मुकूट स्वच्छ केला. त्यावेळी काही लोक तिथे होते. कडभने घरी गेले आणि काही वेळाने परत आले असता चांदीचा मुकूट नव्हता. सगळीकडे पाहिले पण कोठेही सापडला नाही. दहा ते साडेबाराच्या दरम्यान चोरी झाल्याचा अंदाज आहे. दिवसाढवळ्या देवस्थानसारख्या पवित्र ठिकाणी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कडभनवाडी येथील नामदेव कडभने, गणेश कडभने, सुशाल कडभने, राजू कडभने हे ग्रामस्थ जामखेड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत.

Back to top button