नगर : किसनगिरीबाबा दिंडीची नगर प्रदक्षिणा | पुढारी

नगर : किसनगिरीबाबा दिंडीची नगर प्रदक्षिणा

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील देवगड येथील भास्करगिरीबाबांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पंढरपूरमध्ये काढण्यात आलेल्या समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या पादुका पालखी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबा की, जय’ असा जयघोष करत निघालेली नगर प्रदक्षिणा दिंडी पंढरपूरमध्ये आलेल्या वारकर्‍यांचे आकर्षण ठरली.

सुमारे दीड हजार भाविकांचा नगर प्रदक्षिणा दिंडीत सहभाग घेतला. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने पंढरपूर दुमदुमले.
पंढरपूर येथील देवगडच्या भक्त निवास मठापासून नगर प्रदक्षिणा पादुका पालखी दिंडीस रविवारी दुपारी चार वाजता महंत भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली व देवगडचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, शेलोडी येथील जागृती आश्रमाचे प्रमुख महंत भागवताचार्य शंकरजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.

अग्रभागी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत हरिनामाचा जयघोष करत चाललेले झेंडेकरी पथक, त्यामागे पुरुष, ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करणारे भजनी व टाळकरी, ट्रक्टर ट्रॉलीमध्ये पुष्पांनी सजवलेली समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांची पादुका, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भाविक, असे दिंडीचे स्वरूप होते.

नगर प्रदक्षिणा दिंडी विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आली असता भास्करगिरीबाबांच्या हस्ते पंचारती ओवाळून आरती करण्यात आली. यानंतर शिरसाष्टांग वंदन करून भास्करगिरीबाबांनी विठुरायाचे दर्शन घेतले.राज्यात शिस्तबद्ध व आदर्शवत दिंडी म्हणून नावलौकिक असलेल्या देवगडच्या पादुका पालखी दिंडीचे तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये आगमन होताच पुष्पवृष्टी करत दिंडीचे पंढरपूरकरवासीयांनी स्वागत केले. यावेळी नगरप्रदक्षिणा दिंडीप्रसंगी पंढरपूर येथील भाविकांनी स्वागत करून भास्करगिरीबाबांसह स्वामी प्रकाशानंदगिरीबाबांचे संत पूजन केले.

Back to top button