नगर : रस्त्यांची कामे दर्जाहीन होत असल्याच्या तक्रारी | पुढारी

नगर : रस्त्यांची कामे दर्जाहीन होत असल्याच्या तक्रारी

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यात सध्या काही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा अतिशय सुमार आणि दर्जाहीन असल्याच्या तक्रारी जनतेमधून होत असून या कामांची राज्य शासनाने तातडीने चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.

कोपरगाव तालुक्यात सध्या आमदार, खासदार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जिल्हा परिषदेमधील निधीमधून रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु कामाचा वेग लक्षात घेता कामे फक्त आवरण्याचा सपाटा ठेकेदारांकडून सुरू आहे. घाईघाईत कामे करुन घेण्याच्या प्रकारामुळे कामांची गुणवत्ता दिसून येत नाही.

कामे कशा प्रकारे सुरू आहेत हे पाहण्यासाठी संबंधित खात्याचे अधिकारी कामाकडे फिरकताना दिसत नाहीत. पुढे काम चालू, तर मागे लगेच रस्ता उखडल्याचे प्रकार काही ठिकाणी दिसून येत आहे. खडीकरण व डांबरीकरणाची कामे मजबूत स्थितीत होत नसल्याने फार दिवस रस्ते टिकतील, अशी परिस्थिती आज तरी दिसत नाही. वर्षभरात रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे होणार आहे.

Back to top button