नगर : कर्जत शहरात पाणीबाणी | पुढारी

नगर : कर्जत शहरात पाणीबाणी

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत शहराला पाणीपुरवठा खेड येथून होतो. मात्र, या पाणी योजनेला, ज्या रोहित्रमधून वीजपुरवठा करण्यात येतो, ते रोहित्र जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा शनिवारपासून बंद आहे. यामुळे शहरांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

कर्जत शहरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. हा पाणीपुरवठा भीमा नदीवरून थेट जलवाहिनी टाकून करण्यात येतो. काही दिवसांपासून खेड परिसरात वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने त्याचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. रोहित्र दुरुस्त होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती नगरपंचायतच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. पूर्वी दोन दिवसांनी शहरांत नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा चार दिवसांनी करण्यात आला. यामुळे शहरांमध्ये काही प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती. वीजपुरवठा विस्कळीत झालेला असताना, आता पाणी योजनेला पाणीपुरवठा करणारे रोहित्र जळाले.

शहरासाठी पर्यायी व्यवस्थेची गरज

कर्जत शहराचा झपाट्याने विकास होत असताना, उपनगरांचा विस्तारही होत आहे. यामुळे लोकसंख्याही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वीज पंप जळणे किंवा रोहित्रमध्ये बिघाड होणे किंवा वीजपुरवठा सुरळीत होऊन मिळणे यासाठी पर्याय व्यवस्था असणे आवश्यक आहे. यापैकी एकामध्ये बिघाड झाला, तरी नागरिकांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

Back to top button