नगर : सूरत-हैदराबाद महामार्ग : आधी दर, मग जमिनीचे अधिग्रहण | पुढारी

नगर : सूरत-हैदराबाद महामार्ग : आधी दर, मग जमिनीचे अधिग्रहण

नगर : पुढारी वृत्तसेवा : ग्रीन फील्ड सूरत-हैदराबाद -चेन्नई महामार्गासाठी शेतकर्‍यांना विचारात घेतल्याशिवाय तसेच दर जाहीर केल्याशिवाय शेतकर्‍यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येऊ नये, असा इशारा नगर व श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहिदास कर्डिले, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन दिले. अहमदनगर जिल्ह्यातील चार तालुक्यांतून ग्रीन फील्ड सुरत -हैदराबाद -चेन्नई महामार्ग जाणार आहे. त्यामुळे या मार्गासाठी 50 ते 55 गावांतील 1 हजार 250 हेक्टर जमीन संपादित होणार आहे.

शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण

नगर तालुक्यातील काही गावांचा सर्वे झालेला असून, नगर-श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील चिचोंडी पाटील, दशमी गव्हाण, भातोडी, मदडगाव, सारोळा, कोल्हेवाडी, शहापूर या गावांमध्ये गेल्या आठवड्यात सूरत -हैदराबाद ग्रीनफील्ड महामार्गाच्या कर्मचार्‍यांनी दर चार-पाच किलोमीटरवर मार्कीग केल्यामुळे या गावातील शेतकरी धास्तावले आहेत. सध्या पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीस व कांदा लागवड डाळिंब, संत्रा, मोसंबी लावण्यास संभ्रमात आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत इशारा दिला आहे. जमिनीची अधिग्रहण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची मते विचारात घेण्यात यावे, व प्रत्येक गावात ग्रीनफिल्ड महामार्गाच्या अधिकार्‍यांना पाठवून प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये जमिनीचे दर घोषित करून ते योग्य असल्याचे ग्रामपंचायत कार्यालयाकडून मान्यता घ्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे केली.

शेतकरी व अधिकारी यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेऊन विविध अडचणी दूर करण्यात याव्यात, शेतकर्‍यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच शेतकर्‍यांना विश्वासात न घेता जमिनींचे हस्तांतरण केल्यास तीव्र शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केशव बेरड, विजय मिसाळ, प्रकाश पोटे आदीसह काही शेतकरी उपस्थित होते.

जानपीर दर्गा हटविण्यास रिपाइंचा विरोध

नगर-सोलापूर महामार्गासाठी नगर तालुक्यातील दहिगाव येथील जानपीर बाबा दर्गा हटविण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक विभागाने विरोध दर्शविला. दर्गा हटविण्याचा प्रयत्न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदनाव्दारे दिला आहे. यावेळी रिपाई अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, अब्दुल अहमद, संतोष पाडळे, शरीफ सय्यद, आरिफ शेख, फैय्याज शेख, सोहेल शेख, बक्तावर शेख, सद्दाम शेख, इशान्त शेख, नईम शेख हे उपस्थित होते.

जमिनीचे त्रिकोणी, षटकोनी तुकडे पडणार

सूरत-चेन्नई महामार्ग शेतकर्‍यांच्या शेतातून आडवा-तिडवा जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनीचे त्रिकोणी, षटकोनी तुकडे होणार आहेत. त्यामुळे जमीन नापीक होण्याची भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. मुख्य रस्त्यापासून शिवार रस्त्यापर्यंत जाणार्‍या पाऊलवाटा, गाडीवाटा बंद होणार असून, सदर शेती पडिक राहाण्याची शक्यता वाटत आहे. ज्या ठिकाणी जमिनीचे विभाजन होणार आहे, त्या ठिकाणी अंडर बायपास करण्याची मागणी जोर धरत आहे.

Back to top button