नगर : ‘गोदावरीच्या पाण्याने बंधारे भरून द्या’ | पुढारी

नगर : ‘गोदावरीच्या पाण्याने बंधारे भरून द्या’

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला, तरी कोपरगाव तालुक्यात अद्याप पेरणीयुक्त पाऊसच झालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचे पाणी सद्या गोदावरी नदीमधून सोडण्यात आलेले आहे. तेच पाणी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडून लाभक्षेत्रातील गावतळी, शेततळी, के. टी. वेअर्स, छोटे-मोठे बंधारे तातडीने भरून द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यावर्षी शंभर टक्के पाऊस पडेल. असे अंदाज हवामान खात्याने वर्तविले होते. त्या अंदाजावर शेतकर्‍यांनी शेतीची तयारी करुन ठेवलेली होती. राज्यात काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असले, तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र गेल्या महिनाभरापासून पेरणीयुक्त पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. पेरण्या खोळंबल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आलेले आहे.

सद्या गोदावरी नदी प्रवाहित आहे. त्या पाण्याचा शेतीला काहीच उपयोग होत नाही. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडलेले नसल्याने लाभक्षेत्रात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. पेरण्या खोळंबलेल्या आहेत. गावतळे व शेततळ्यांचे उद्भव कोरडे पडल्याने माणसांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे.

सद्या गोदावरी नदीपात्रातून सोडण्यात आलेले पाणी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडून लाभक्षेत्रातील शेततळे, गावतळे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरून दिल्यास विहिरी व कूपनलिकांच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागेल. थोड्या फार प्रमाणात पेरण्याही करता येतील.

कोपरगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असल्याने या परिस्थितीचा गांभिर्याने विचार होऊन गोदावरी नदी पात्रातून सोडण्यात आलेले पाणी कालव्यांद्वारे सोडण्यात यावे. त्या माध्यमातून कोरडे झालेले सर्व उद्भव भरुन देऊन उर्वरित पाणी गोदावरी नदीत वळविण्यात यावे. यासंदर्भात संबंधित पाटबंधारे विभागास आपल्या सूचना व्हाव्यात, अशीही मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Back to top button