नगर : आश्वासनानंतर काळे यांचे आंदोलन स्थगित | पुढारी

नगर : आश्वासनानंतर काळे यांचे आंदोलन स्थगित

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील वाडगाव रस्ता परिसरातील बंदिस्त गटारीचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिल्यावर भाजप कार्यकर्ते नारायण काळे यांनी गटारीत बसून सुरू केलेले आंदोलन मागे घेतले आहे.

टाकळीभान येथील प्रभाग क्रमांक दोनमध्ये वाडगाव रस्त्यालगतचे बंदिस्त गटारीचे काम सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा ग्रामपंचायतकडे केली. मात्र, ग्रामपंचायतने मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नारायण काळे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन गटारीचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा चार जुलै रोजी गटारीत बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या इशार्‍याप्रमाणे काळे यांनी गटारीत बसून आंदोलन केले.

वाडगाव रस्ता येथील बंदिस्त गटारीचे काम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे गटारीचे पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार मागणी करुनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे येथील बंदिस्त गटार योजनेचे काम सुरू करावे, अन्यथा चार जुलै रोजी येथील साचलेल्या गटारीत बसून आंदोलन केले जाईल, असा इशारा काळे यांनी दिला होता.
काळे यांचे गटारीत बसून आंदोलन सुरू झाल्यावर उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी आठ दिवसांत गटारीचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन काळेंना दिल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी नानासाहेब पवार, रमेश धुमाळ, बंडू हापसे, बापूसाहेब शिंदे, राजेंद्र रणनवरे, भाऊसाहेब पवार, चंद्रकांत थोरात, विकास मगर, बबलू वाघुले, सुभाष ब्राह्मणे, गोतीस, डॉ. हुळहुळे, भाऊसाहेब पटारे, अशोक कचे आदी उपस्थित होते.

Back to top button