नगर : क्रीडांगण अहवाल गुलदस्त्यातच! | पुढारी

नगर : क्रीडांगण अहवाल गुलदस्त्यातच!

नगर : पुढारी वृत्तसेवा : सीईओ आशिष येरेकर यांनी क्रीडांगण विकास योजनेतील संबंधित शाळांचा अहवाल शिक्षणाधिकार्‍यांकडे मागावला होता. संबंधित अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होतील, असे शिक्षणाधिकार्‍यांनीही स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात सोमवारी ‘ते’ अहवाल माझ्याकडे अजून आले नसल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले, क्रीडांगण विकास योजनेतून ज्या शाळांची कामे झाली आहेत, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे लेखी जबाब असलेले अहवाल पाठविण्याबाबत गटशिक्षणाधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. आज सोमवारी सकाळी झालेल्या व्हिसीतही तशा पुन्हा सूचना केल्या आहेत. शिक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडूनही अहवाल घेतला जाणार आहे. मात्र, अद्याप तालुकास्तरावरून कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही, सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व अहवाल माझ्याकडे येतील, अशी अपेक्षा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, सीईओंनी सूचना करूनही शिक्षण विभागाचे अहवाल वेळेत प्राप्त होत नसतील,तर याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामध्ये नेमके कोण आणि कोणाला पाठीशी घालत आहे, याकडे सीईओ येरेकर गांभीर्याने पाहणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button