नगर : दाखविली एक, खरेदी दुसर्‍याच जमिनीची! | पुढारी

नगर : दाखविली एक, खरेदी दुसर्‍याच जमिनीची!

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या व्यवहारात एका सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍याची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत पाथर्डी शहरातील साईनाथनगर येथे राहणारे प्राथमिक शिक्षक प्रशांत सुभाष नजन यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात पिराजी आप्पा पवार (रा.शिक्षक कॉलनी), नवनाथ रामभाऊ पवार (रा.नाथनगर) पाथर्डी या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रशांत नजन यांचे वडील सुभाष रंगनाथ नजन (रा. साईनाथ नगर, पाथर्डी) हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे नोकरी करत होते. ते एप्रिल 2019 रोजी सेवानिवृत्त झाले. पिराजी पवार व सुभाष नजन यांची तोंडओळख होती. पवार याने सुभाष नजन यांना पाथर्डीतील खंडोबा माळ येथील 39 गुंठे जमिनीपैकी 26 गुंठे जमीन प्रत्येकी 13 गुंठे जमीन प्रती गुंठा 2 लाख रुपये याप्रमाणे आपण दोघात घेऊ. तुमच्या वाट्याला 26 लाख रुपये येतील, असे सांगितले. त्यानंतर पिराजी पवार व नवनाथ पवार हे दोघे डिसेंबर 2020 मध्ये नजन यांच्या घरी आले व त्या 26 गुंठे जमिनीचा मूळ मालकाशी 52 लाख रुपयांमध्ये व्यवहार झाल्याचे सांगितले. सदर जमीन घेण्यासाठी खूप लोक टपून असल्याने त्या मालकाचे नाव गुपित ठेवले आहे. तुम्ही आता इसार म्हणून 1 लाख रुपये द्या व उर्वरित 25 लाख रुपये नंतर द्या. असे दोघे म्हणाले. त्यानंतर सुभाष नजन यांनी 1 लाख रुपये पिराजी पवार, नवनाथ पवार यांना दिले.

त्यानंतर दि.1 सप्टेंबर 2020 पर्यंत सुभाष नजन यांनी पवार यांना ठरल्याप्रमाणे वेळोवेळी 26 लाख रुपये रोख दिले. मात्र, पवार याने विश्वासघात करुन खंडोबा माळ येथील जमिनीऐवजी बालवे वस्ती येथील अशोक दशरथ औटी, संतोष दशरथ औटी, केशरबाई दशरथ औटी, शोभा अशोक वाघ, तारा गोरक्ष वाघ, आशा दिलीप पांडव यांच्या नावे असलेली 21 गुंठे जमीन नजन व पिराजी आप्पा पवार अशा नावाने खरेदीखत केले आहे. खरेदीखताची मूळ नक्कल भेटल्यानंतर पिराजी पवार, नवनाथ पवार यांनी विश्वासघात केल्याचे लक्षात आले. बालवे वस्ती येथील कमी किंमतीची 21 गुंठे जमीन 3 लाख 20 हजार रुपयांमध्ये खरेदी करून सुभाष नजन यांच्याकडून वेळोवेळी 26 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे प्रशांत नजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

उर्वरित पैसे देण्यास नकार

या सर्व घटनेनंतर नजन यांनी पिराजी पवार व नवनाथ पवार यांना तुम्ही आमची फसवणूक केली आहे. आम्हाला आमचे पैसे परत द्या, अशी मागणी केली. त्यावर आज देतो, नंतर देतो असे सांगून आजपर्यंत पैसे दिले नाही. आता आम्ही पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे पवार म्हणाल्याचे प्रशांत नजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button