पारनेर : अण्णा, तुमचे मार्गदर्शन असू द्या! : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

पारनेर : अण्णा, तुमचे मार्गदर्शन असू द्या! : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शनिवारी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद झाला. यावेळी अण्णांनी दिलेल्या शुभेच्छा एकनाथ शिंदे यांनी स्वीकारल्या. ‘तुमचे मार्गदर्शन असू द्या, काही वाटलं तर आदेश करत जा, सूचना करत जा, राज्याच्या हितासाठी राज्यातील जनतेला आवश्यक असणारे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्व सहकारी करू. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने आम्हाला आदेश करत जा,’ असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात एक आठवडा सुरू असलेल्या सत्ता नाट्यबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यापूर्वी बोलण्याचे टाळले. कोणती प्रतिक्रिया किंवा भाष्य त्यांनी केले नव्हते. परंतु, नुकतेच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. शिंदे यांनी अण्णांचे आभार मानत शुभेच्छाबद्दल धन्यवाद दिले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रासाठी हे खूप सुंदर झालं, असं पहिल्यांदाच होत आहे. तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. त्याची ही पावती असून, तुमची जोडगोळी चांगली काम करेल. चांगल्या कामाला दृष्ट फार लवकर लागत असते, असेही हजारे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या जनतेसाठी काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांना आश्वस्त केलं. शिवाय तुमच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचेही ते अण्णांना म्हणाले.

Back to top button