नगर : ‘भाजप’वासी विखेंची होणार ‘सरशी’ | पुढारी

नगर : ‘भाजप’वासी विखेंची होणार ‘सरशी’

विष्णू वाघ  :

नगर : प्रतिनिधी  : राज्यात आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘भाजप’वासी झाल्यानंतर पूर्ण ताकदीने पक्षाची कमान सांभाळली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या ‘गुडबुक’मध्ये स्थान मिळविल्याने त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार अशी चर्चा आहे. ज्याची खावी ‘पोळी’ त्याची वाजवावी ‘टाळी’ ही म्हण ग्रामीण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहे.

या म्हणीची आज आठवण होण्याचे कारणही तसेच आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडून ‘नगर दक्षिण’ लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळविली. त्यामुळे मुलगा एका पक्षात व वडील दुसर्‍या पक्षात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून विखे पिता-पुत्रांनी मागे वळून बघितले नाही.

डॉ.सुजय विखे पाटील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार, तर राधाकृष्ण विखे पाटील राहाता विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. भाजपमध्ये विखे पिता-पुत्र रमणार काय? सुटा-बुटातील भाजप सरकारमध्ये विखे पिता-पुत्रांना सन्मानाची वागणूक मिळणार काय? याबाबत राज्यात मोठ्या प्रमाणावर बराच काळ चर्चा झाली. परंतु, आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये काम करीत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेमक्या दुखर्‍या बाजूवर बोट ठेवून बेधडक आरोप केले. एवढेच नाही तर देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध योजनांचा लाभ मतदार संघामध्ये मिळवून दिला.

तसेच, जिल्ह्यामध्ये ‘भाजप’च्या ध्येय धोरणानुसार पक्ष बांधणीस मोठा हातभार लावला. देशाचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची देशातील पहिली सहकार परिषद ‘प्रवरानगर’ या सहकार पंढरीत घेऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. तसेच, केंद्राच्या सहकार मंत्रालयाच्या निर्मितीनंतर राज्यात आघाडी सरकारने भाजप सहकार बुडविणार असल्याचे आरोप केले. परंतु, आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकारी चळवळ देशाचा आर्थिक कणा असून, तिला योग्य दिशा दिली, तर मोठी क्रांती होऊ शकते, याबाबतचा संपूर्ण डाटा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहचविला.

त्यामुळे आ. विखे पाटील हे राज्य व केंद्रातील ‘सहकार दूत’ म्हणून परिचित झाले. खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनीही भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी नेटाने पुढे रेटली. एवढेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील वयोवृद्ध जनतेसाठी सुरु केलेली ‘वयोश्री साधन योजने’साठी 48 कोटींचे उद्दिष्ट्य जाहीर करण्यात आले.

त्यापैकी 40 कोटींचा निधी खा. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर लोकसभा मतदार संघातील वयोवृद्धांपर्यंत पोहचविला. त्यांच्या या कार्याची दखल घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे दिल्लीमध्ये आवाहन केले.

एकूणच विखे पिता-पुत्रांनी ‘भाजप’मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी या पक्षाचे विचार समजून घेतले. देशाला विकासाच्या वाटेवर अग्रभागी नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस हेच खरे काम करीत असल्याचे पोटतिडकीने सांगितले. तसेच, ‘भाजप’चा पक्षीय कोणताही कार्यक्रम असो त्याची प्रभावीपणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी केली. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव अग्रभागी असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्ह्याला दोन मंत्रीपदाची लॉटरी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांची जिल्ह्यामध्ये नव्याने बांधणी होणार असली तरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू मित्र म्हणून आ.राधाकृष्ण विखे पाटील व आ.प्रा. राम शिंदे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याशिवाय तिसर्‍या मंत्रीपदाची अनेकांना अपेक्षा आहे.

विखे यांच्या खात्याकडे लक्ष !
आ.राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेतील अनुभवी सदस्य आहेत. ‘भाजप’ने त्यांचे नाव प्रथम विधानसभा अध्यक्ष पदासाठी जाहीर केले होते. परंतु, आ. विखे पाटील यांनी कृषी, विधी व न्याय तसेच पणन, परिवहन मंत्री म्हणून लोकाभिमुख काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या खात्याचे मंत्रीपद मिळते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Back to top button