नेवाशात प्रवरा नदीत मृत मासे | पुढारी

नेवाशात प्रवरा नदीत मृत मासे

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवाशातील प्रवरा नदीतील मासे गेल्या 4-5 दिवसांपासून मृत्यू पावत असल्याचे आढळून येत आहे. मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाला आहे. मासे कशामुळे मरत आहेत, हे मात्र समजू शकलेले नाही. या प्रकारामुळे नदीतील पाणी दूषित झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकारामुळेे शहरात भितीयुक्त खळबळ उडाली आहे. हा प्रकार निश्चित कशामुळे हे कोणालाही सांगता येत नाही. गेल्या आठवड्यात नेवासा तालुक्यातील नदीच्या वरच्या भागात जोरदार पाऊस झाल्याने ओढ्या-नाल्यांना पाणी आले होते.

या नाल्याबरोबरच लेंडगा नाल्यालाही पाणी आल्याने हे पावसाचे पाणी चिंचबन, खुपटी भागातून प्रवरा नदीत आलेले आहे. हे पाणी आल्या नंतरच मासे मरण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून नेवासा शहरातील प्रवरा नदीत चिंचबन, खुपटी भागातून पाणी आल्यानंतर नदीतील प्रवरा पुलाजवळ, तसेच पुलाच्या मागील भागात मासे मरून पाण्यावर तरंगताना नागरिकांना दिसत आहे. आता हे मासे तरंगत मृत आवस्थेत मध्यमेश्वर बंधार्‍यात जमा झाले आहेत. बरेच मासे बंधार्‍याच्या व नदीच्या किनारी जमा झाले आहेत

मोठ्या प्रमाणात मासे मरण्याची घटना पहिल्यांदाच झालेली आहे. मृत माशांमध्ये 100 ग्रॅम पासूने 5 किलो वजनापर्यंतच्या माशांचा समावेश असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे पाणीही दूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे शहरात व परिसरात भितीयुक्त खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.

जनावरेही पाणी पित नाहीत
याबाबत नदीत मासेमारी करणार्‍या काही लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात नदीच्या वरच्या भागात पाऊस होऊन तेच पाणी नदीत आल्या नंतरच्या काळातच मासे मरण्याचा प्रकार झाला आहे. जनावरेही नदीचे पाणी पिण्यास धजावत नाही. बरेच मासे पाण्यावर तरंगले, तर काही पाण्यात बुडाल्याचे या लोकांनी सांगितले.

Back to top button