नगर : शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विखे फिक्स; राजळेंना संधी? | पुढारी

नगर : शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विखे फिक्स; राजळेंना संधी?

नगर/पाथर्डी : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री पदाचा मोह दूर सारत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करत महाराष्ट्राला धक्का दिला. स्वत: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस आता नगरकरांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांचे मंत्री मंडळातील स्थान नक्की मानले जाते, तर दुसरे मंत्रिपद राम शिंदे की मोनिका राजळे अशी चर्चा रंगत असतानाच राजळेंना मंत्रिपद देऊन फडणवीस माजी मंत्री पंकजा मुंडे गटासह जिल्ह्याला धक्का देतील, असे भाकित राजकीय गोटात वर्तविले जात आहे.

आ. राजळे यांच्या मंत्रिपदाच्या निमित्ताने जिल्ह्यातून पहिल्याच महिला मंत्री असतील. पंकजा मुंडे यांच्याशी बहिणीचे नाते असलेल्या राजळे यांना मंत्रिपद देऊन मुंडे गटासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनाही धक्का देण्याची खलबत फडणवीस गटात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगर जिल्ह्यात आ. राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते आणि मोनिका राजळे हे तिघे भाजपचे आमदार आहे. विधान परिषदेवर निवडून आलेले राम शिंदे हे भाजपचे जिल्ह्यातील चौथे आमदार. शिंदे हे जसे फडणवीस यांचे ‘खास’ मानले जातात, तसेच राजळे याही फडणवीस यांच्या निकटवर्तीयापैकी ओळखल्या जातात.

राजळे या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघात भाजपाचे नेतृत्व करत असून आमदारकी दुसरी टर्म आहे. विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी समरस असणार्‍या राजळे यांच्या सोज्वळ प्रतिमेचा लाभ भाजपला होईल असाही दावा समर्थकांकडून केला जात आहे. राजळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी जिल्ह्यातून कोणाचा विरोध नसणार, ही राजळे यांच्या जमेची बाजू मानली जाते.
माजी मंत्री पंकजा मुंडे या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असून राजळेंशी त्यांनी बहिणीचे नाते पाथर्डीकरांना सांगितले आहे. मुंडेंच्या बहिणीला अर्थात राजळेंना मंत्रिपद देऊन मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नाही केला जावू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय माजी मंत्री अशोक डोणगावकर व फडणवीस यांचे कौटुंबिक संबंध पाहता राजळेंना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, असा दावा सूत्रांनी केला.

महाविकास आघडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेतली. आता मंत्रिमंळाचा विस्तार केला जाणार आहे. आमदार राजळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर जिल्ह्यात पहिल्यांदा एका महिलेला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. नगर जिल्ह्यात शंकरराव गडाख सोडले तर एकही शिवसेनेचा आमदार नाही. जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख खा. शरद पवार यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना शह देण्यासाठी फडणवीस विखे यांच्यासोबतच राजळे यांनाही मंत्री करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस व माजी आमदार स्व. राजीव राजळे दोघेही विधीमंडळात वेगवेगळ्या पक्षाचे आमदार असले तरी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांचाही मोलाचा वाटा होता. 2019 च्या निवडणुकीतही राजळे या दुसर्‍यांदा आमदार झाल्या.

आ. राम शिंदे हे फडणवीस यांचे खास असले तरी त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली आहे. भाजप-सेनेचे सरकार म्हणून शिंदे यांना तसाही फायदा मतदारसंघात पवारांना शह देण्यासाठी होईल, असे मानले जाते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिंदे की राजळे? दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.

 

Back to top button