नगर: शिंगणापूर दिंडीचेटाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान | पुढारी

नगर: शिंगणापूर दिंडीचेटाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान

सोनई : पुढारी वृत्तसेवा: शनैश्वर देवस्थानची महंत उदासी महाराज आषाढी वारी दिंडीचे आज शिंगणापूर ते पंढरपूरला ‘ज्ञानोबा तुकोबा…जय शनिदेव…’ जय घोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान झाले. सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष विश्वासराव गडाख यांच्या हस्ते रथ व पालखीचे पूजन करण्यात आले. या दिंडीचे 29 जून ते 11 जुलैपर्यंत आयोजन केले असून, दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण 29 जून रोजी धनगरवाडी, 30 जून रोजी नगर, 1 जुलैला रुईछत्तीसी, 2 जुलै कोकणगाव (ता.कर्जत), 3 जुलै डाकू निमगाव (ता. कर्जत), 4 जुलै देवळाली (ता करमाळा), 5 जुलै जेऊर (ता. करमाळा), 6 जुलै टेंभूर्णी, 7 जुलै करकंब (ता. पंढरपूर), 8 जुलै पंढरपूर येथील शनेश्वर देवस्थानच्या शनी मठात मुक्काम आहे.

10 जुलै रोजी पहाटे चार वाजता पंढरपूर दिंडी प्रदक्षिणा होणार असून, दिंडीत दररोज काकड, आरती, हरिभजन, हरिपाठ व रात्री कीर्तन, असे कार्यक्रम आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे पंढरपूरला जाता न आल्याने विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भक्तांत विशेष उत्साहाचे वातावरण होते. सोमवारी (दि.11 जुलै) सकाळी नऊ वाजता कीर्तन होणार आहे. दिंडी प्रस्थानच्या वेळी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे, चिटणीस आप्पासाहेब शेटे व विश्वस्त मंडळ, पोलिस पाटील सयाराम बानकर, सोनई सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब निमसे, पत्रकार विनायक दरंदले, सुरेश बानकर, पोपट शेटे, पत्रकार सुनील दरंदले, देवस्थानचे अधिकारी व भाविक उपस्थित होते.

Back to top button