राहाता पोस्ट ऑफिसमध्ये रेव्हेन्यू तिकिटांचा तुटवडा | पुढारी

राहाता पोस्ट ऑफिसमध्ये रेव्हेन्यू तिकिटांचा तुटवडा

साकुरी : पुढारी वृत्तसेवा:  राहाता पोस्ट ऑफिस कार्यालयात गेल्या पंधरा दिवसांपासून एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे परिसरातील आर्थिक व्यवहारांवर त्याचा परिणाम होत आहे. आमच्या प्रतिनिधीने याची खातरजमा करत पोस्ट कार्यालयात जाऊन तेथील पोस्ट मास्तरला याविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की, आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार तिकिटाची मागणी करत असून वरिष्ठ कार्यालयाकडून तिकीट उपलब्ध होत नाहीत.

श्रीरामपूर येथील ट्रेझरी कार्यालयामध्ये तिकीट शिल्लक नसल्याने तसेच श्रीरामपूर ट्रेझरीचा करार संपला असल्यामुळे एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटाचा श्रीरामपूर डिव्हिजनमध्ये तुटवडा जाणवत आहे. लवकरच रेव्हेन्यू तिकीट उपलब्ध केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बँक, नगरपालिका, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी अनेक व्यवहारासाठी रेव्हेन्यू तिकीट आवश्यक असते. तिकीट शिल्लक नसल्याने अनेकांना तिकीट उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. रेव्हेन्यू तिकीट उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांना शेती कर्ज वेळेवर उपलब्ध होत नाही.

Back to top button