नगर : शहर परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी | पुढारी

नगर : शहर परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी

नगर  : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याकडे अनेक दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने गुरूवारी (दि.23) दुपारनंतर शहर परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घरी परतणार्‍यांची चांगलीच धांदल उडाली.

शहर परिसरात दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊसधारा कोसळल्या. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे कामावरून घरी परतणारे नागरिक, शाळा सुटल्याने विशेषत: सायकलवरून घरी जाणारे विद्यार्थी, रस्त्यावर व्यवसाय करणारे यांची चांगलीच धांदल उडाली. बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांचीही या पावसाने त्रेधातिरपीट उडाली.

शहरातील बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडलेले असून, दुरूस्ती झालेली नसल्याने त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहने काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागली. पावसाचे पाणी साचून शहरातील रस्त्यांची आणखी दुरवस्था होणार आहे. मात्र, शहर परिसरातील केडगाव, सावेडी आदी उपनगरांसह पाऊस झाल्याने गेल्या अनेक दिवसापासून उकाड्याने हैैराण झालेल्या नगरकरांना पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा मिळाला.

जिल्ह्यात काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर दडी मारलेली आहे. रोहिणी व मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. काही भागात झालेल्या अल्प पावसावर करण्यात आलेल्या खरिपाच्या पेरणीनंतर पिके चांगली उगवून आलेली आहेत.

मात्र, पावसाअभावी ती सुकू लागली आहेत. या पिकांना आता पावसाची गरज आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतातूर झालेला आहे. अनेक गावात जलस्त्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक जूनच्या सुरुवातीपासूनच गावांत प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू केले आहेत. जिल्ह्यात अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठी असलातरी, शेतीसाठी चांगल्या पावसाची गरज आहे.

Back to top button