नगर : पहिल्याच पावसात गुंडेगावचा बंधारा तुडूंब | पुढारी

नगर : पहिल्याच पावसात गुंडेगावचा बंधारा तुडूंब

वाळकी : पुढारी वृत्तसेवा: गुंडेगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसाने वाटीदरावस्ती परिसरातील नव्यानेच काम पूर्ण झालेला बंधारा तुडूंब भरला आहे. पाणीटंचाईचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना पहिल्याच पावसात बंधारा भरल्याने मोठा दिलासा मिळाला. जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते बंधार्‍यातील पाण्यात श्रीफळ अपर्ण करत जलपूजन करण्यात आले.

जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांनी गुंडेगाव परिसरात नियोजनपूर्वक केलेल्या बंधार्‍यांच्या उभारणीमुळे पावसाचे वाहुन जाणारे पाणी अडवून परिसर पाणीदार बनला आहे. त्यामुळे कायमच पाणीटंचाईचा सामना करणारे शेतकरी सुखावले आहेत. गुंडेगावला तीनही बाजूंनी डोंगरांनी वेढा दिला आहे. पावसाळ्यात डोंगरातून येणारे पाणी नदी, नाल्याद्वारे वाहून जात असल्याने, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजना राबवत हराळ यांच्या प्रयत्नांतून डोंगर उतारावर पाचशे हेक्टर क्षेत्रावर चारी खोदकाम पूर्ण झाले.

त्याचबरोबर 40 लहान बंधारे व नऊ तलावांची उभारणी करून गाव पाणीदार बनवले आहे. त्यामुळे जिरायती म्हणून ओळख असलेला गुंडेगाव परिसर बागायती बनला आहे. बंधारे उभारणीसाठी शेतकर्‍यांनी स्वतःचे क्षेत्र दिले. जोरदार पाऊस झाल्याने बाळासाहेब हराळ यांनी शेतकर्‍यांसह सर्वच बंधार्‍यांची पाहणी केली. यावेळी एकनाथ हराळ, रामदास भापकर, पोपटराव भापकर, तात्या भापकर, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

परिसरातील बागायती क्षेत्रात वाढ
गुंडेगावसह वाळकी परिसरात पावसाने उशिरा पण, जोरदार हजेरी लावली. गुंडेगाव येथील वाटीदरा परिसरात नव्यानेच पूर्ण झालेला बंधारा पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी रात्रीतून वाढली आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढत असल्याने संत्रा, डाळिंब, द्राक्षबागेचेही क्षेत्र वाढले.

Back to top button