नगर : घारगाव परिसरात मुसळधार पाऊस | पुढारी

नगर : घारगाव परिसरात मुसळधार पाऊस

घारगाव : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील घारगांव येथे बुधवारी दुपारी आणि रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसाने परिसरात पाणीच पाणी होऊन शेतीसह रस्ते, दुकानातील मालाचे नुकसान झाले. शेतातील ताली फुटल्या. दुकानांमध्ये पाणी घुसले. बुधवारी दुपारी पावसाला जोरदार सुरवात झाली. मेघगर्जनेसह तुफान पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले.

यावेळी घारगावच्या पूर्व भागात अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाला. तेथे पडलेल्या तुफान पावसाने क्षणार्धात ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले. दुपारी दोन तास झालेल्या पावसाने झोडपले असतानाच, रात्री दहाच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. शेतात पाणी साचल्याने बांध व ताली फुटून गेल्या. शेततळी, विहिरी भरून वाहू लागल्या.

शाहरूखच्या चित्रपटात दीपिकाचा कॅमिओ

यावेळी गावठाण आणि स्टँड परिसरातील घरांमध्ये आणि व्यापारी गाळ्यांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान टाळण्यासाठी नागरिकांची भर पावसात पाणी बाहेर काढण्यासाठी धांदल उडाली. अनेक ग्रामस्थांचे प्रापंचिक तसेच साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले.
या परिसरात सुमारे तीन तास सलग संततधार पाऊस सुरू होता. दुपारी सुरू झालेला पाऊस थांबून रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यात काही ठिकाणी जमीन खचली.

रस्त्याच्या कडेला गटारी नसल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. वीज खंडित झाल्याने ग्रामस्थांना रात्रभर अंधारात राहावे लागले. वीजपुरवठा खंडित होण्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. गेल्या पाच दशकांतील सर्वांत मोठ्या पावसाची नोंद झाल्याचे जुने जाणकार सांगतात.

Back to top button