सिद्धिविनायकाच्या चरणी आमदार प्रा. राम शिंदे | पुढारी

सिद्धिविनायकाच्या चरणी आमदार प्रा. राम शिंदे

सिद्धटेक : पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण राज्यात आज सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना; दुसरीकडे नवनिर्वाचित आमदार प्रा. राम शिंदे यांनी आज सिद्धटेकमध्ये येऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
अष्टविनायकातील एक स्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात आज दर्शनासाठी आमदार प्रा. राम शिंदे आले. भाजपचे अनेक कार्यकर्ते सकाळपासून तयारी दिसत होते.

गतकाळात सत्तेपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना नवनिर्वाचित आमदारांच्या नियुक्तीमुळे मोठे बळ आले आहे. माजी मंत्री व नवनिर्वाचित आमदार प्रा. राम शिंदे आल्यानंतर प्रथम वाद्यांचा कडकडाट व आतषबाजी करण्यात आली. यावेळी नगर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

दर्शनासाठी भेट दिल्यानंतर मंदिरात सिद्धिविनायकाची आरती व अभिषेक करण्यात आला. चिंचवड देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ, पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे शाल श्रीफळ देऊन आमदार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा परिषद माजी सदस्य शांतीलाल कोपनर, चिंतामण सांगळे, नागनाथ जाधव, बंडा मोरे, सारंग नलगे, रमेश शेळके, सचिन बनकर, सूदर्शन कोपनर आदी उपस्थित होते.

भाजपचीही रणनिती का?
मागील निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपला आलेल्या अपयशानंतर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीने ताकद लावत पक्ष वाढीचे सर्व प्रयत्न सुरू केले. याच कालखंडात ‘जिकडे भंडार…तिकडे उदे उदे’ या उक्तीप्रमाणे पक्षातीलच काही कार्यकर्ते विरोधी गोटात सामील झाले, तर काहींनी छुपा पाठिंबा दिला. हे प्रस्थ वेळीच रोखण्यासाठी राम शिंदे यांना दिलेली संधी ही राज्यातील लक्षवेधी ठरणार आहे. पवार कुटुंबातील रोहित पवार यांना शह देण्यासाठी भाजपची ही रणनिती आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे.

त्यांनी उत्तर देणे टाळले..!
दर्शनासाठी मंदिरात आल्यानंतर पत्रकारांनी नवनिर्वाचित आमदारांना राज्यातील राजकीय घडामोडी व आगामी डावपेच याबाबत प्रश्न विचारला असता याबाबत उत्तर देणे त्यांनी टाळले.

Back to top button