नगर : काष्टी ग्रामपंचायतीमध्ये पाचपुतेंचा शब्द डावलला | पुढारी

नगर : काष्टी ग्रामपंचायतीमध्ये पाचपुतेंचा शब्द डावलला

काष्टी : पुढारी वृत्तसेवा: श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रतिभा रवींद्र दांगट यांची मतदान पद्धतीने निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार बबनराव पाचपुते यांचा शब्द का डावलला, याचीच गावभर चर्चा सुरू आहे.
दि. 22 रोजी दुपारी 2 वाजता काष्टी ग्रामपंचायतीच्या अतिशय प्रतिष्ठेच्या उपसरपंच निवडीमध्ये दोन महिन्यांपूर्वी उपसरपंच स्व. सुनील पाचपुते यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

आज पुन्हा सरपंच आश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक साहेबराव घोरपडे यांनी उपसरपंच निवडणूक घेतली. उपसरपंचपदासाठी हेमा सुनील पाचपुते, प्रतिभा रवींद्र दांगट, विरोधी सदस्य चांगदेव पाचपुते व जालिंदर पाचपुते यांनी अर्ज दाखल केले. ऐनवेळी चांगदेव पाचपुते व जालिंदर पाचपुते यांनी अर्ज मागे घेतले.

उस्मानाबाद : जाता-जाता कळंबकरांना महाविकास आघाडीची भेट

आमदार पाचपुते यांनी आपल्या सर्व सदस्यांना निवासस्थानी बोलावून स्व. सुनील पाचपुते यांच्याच पत्नीला चार महिन्यांसाठी संधी द्या, असे सांगितले. बाकी सदस्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत.

पण प्रतिभा दांगट यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. तेव्हा आजपर्यंतच्या इतिहासात ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच निवडणूक घेऊन गुप्त मतदान पद्धतीने निवड झाली. यामध्ये प्रतिभा दांगट यांना नऊ मते मिळाली, तर हेमा पाचपुते यांना सात मते पडली. एक मतपत्रिका कोरी निघाली. यामध्ये प्रतिभा दांगट यांना विजयी घोषित करण्यात आले. या निवडीमध्ये आमदार पाचपुते यांचा शब्द काही सदस्यांनी डावलला व विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट केले.

या निवडीमध्ये मोठा घोडेबाजार झाल्याची खमंग चर्चा आहे. निवडीवेळी युवा नेते प्रतापसिंह पाचपुते, वैभव पाचपुते, बन्सी पाचपुते, दादासाहेब दांगट, अनिल पाचपुते आदी उपस्थित होते.

इशारा देणारा ‘तो’ कोण
उद्या उपसरपंच निवडणूक आहे. तुम्ही माझे ऐकणार की दादांचे, ते मला सांगा. नाहीतर मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देणार्‍या नेत्याचाच उपसरपंच झाला. पण असा इशारा देणारा ‘तो’ कोण याचीच सर्वत्र चर्चा आहे.

Back to top button