नगर : ऊन-पावसाचा खेळ, खरिपाचा बसेना मेळ; राहुरीत केवळ 26 टक्के पेरण्या | पुढारी

नगर : ऊन-पावसाचा खेळ, खरिपाचा बसेना मेळ; राहुरीत केवळ 26 टक्के पेरण्या

राहुरी : पुढारी वृत्तसेवा: राहुरी परिसरामध्ये सोमवारी दुपारपर्यंत रणरणते ऊन तर सायंकाळच्या दरम्यान आभाळ दाटल्यानंतर दोन- चार थेंबांपलिकडे पाऊस पडत नसल्याने खरीप पेरण्यांचा खोळंबा झाल्याचे निराशाजनक चित्र दिसतप आहे. पाट पाण्यावर आधारित क्षेत्रावरील पेरणी झाली, परंतु पावसावर आधारित असलेल्या शेत जमिनी अजूनही उजाड पडल्याचे बिकट चित्र दिसत आहे. राहुरी तालुक्यात खरीपाची केवळ 26 टक्के पेरणी झाली. पावसाची चातकासारखी वाट पाहत बसलेल्या शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

हवामान खात्याने यंदाच्या मान्सून हंगामात अपेक्षपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविली, परंतु त्या शक्यतेला अद्यापी निसर्गाने विरोध दर्शविल्याचे चित्र सद्यस्थितीला आहे. मान्सून प्रारंभ होऊन अपेक्षेनुरूप पाऊस पडला नाही. त्याचा परिणाम राहुरी परिसरात दिसू लागला आहे. ऊस क्षेत्रासह राहुरी परिसरामध्ये 24 हजार 919 हेक्टर क्षेत्र खरीपासाठी अपेक्षित असते. केवळ 6 हजार 626 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा झाला आहे. खरीप पिकांमध्ये बाजरी, मका, तूर, मुग, भुईमूग, सोयाबीन, कांदा, ऊस हे पिके राहुरी परिसरात घेतली जातात.

यापैकी राहुरी कृषी विभागाने 3 हजार 683 हेक्टर क्षेत्रावर बाजरी पीक घेतले जाईल, अशी अपेक्षा व्यक्ती केली असताना केवळ 110 हेक्टर क्षेत्रावर बाजरी पेरणी झाली आहे. 1 हजार 702 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचे क्षेत्र अपेक्षित असताना केवळ 60 हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झाली. तूर, मुगाच्या पेरण्या अजूनही ताटकळल्या आहेत. तूरीसाठी 47 तर मूग 1085 हेक्टर क्षेत्र अपेक्षित धरले आहे. भुईमूग 522 हेक्टर अपेक्षित असताना त्याचाही आकडा अजून निरंक आहे. सोयाबीन 2034 हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असताना केवळ 30 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. कपाशीला मात्र शेतकर्‍यांनाी अधिक पसंती दिली आहे.

रोटरी क्लबतर्फे व्हिल चेअरचे वाटप

7003 हेक्टर क्षेत्र कापूस ग्रहीत असताना 5 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा पूर्ण झाला आहे. यंदाच्या खरीपाला 8 हजार 799 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. मागिल वर्षी कापूस पिकाला उच्चांकी दर मिळाला तर ऊस क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांची तोडणी मिळत नसल्याने वाताहात झाली. याचा परिणाम यंदाच्या खरीप पेरण्याच्या आकडेवारीत स्पष्ट दिसत आहे. ऊस क्षेत्र घटले तर कपाशीचे क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे. मागिल वर्षी9 हजारांपेक्षा जास्त भाव कापसाला मिळाला. यंदाही चांगला दर लाभेल या अपेक्षेने शेतकर्‍यांनी कापसाला पसंती दिली आहे. दरवर्षी 12 हजार हेक्टर क्षेत्र ऊस पीकाचे राहुरी परिसरात असते, परंतु यंदा ऊस क्षेत्र घटेल, असे चित्र आहे.

दरम्यान, राहुरी परिसरामध्ये पावसाची अजूनही कृपा झाली नाही. वांबोरीमध्ये वादळी वार्‍यासह एक जोरदार पाऊस झाला. यानंतर अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. शेतकर्‍यांना मागिल वर्षी मुळा व भंडारदरा धरणात पाणी जमा झाल्याचा लाभ मिळाला. मुळा धरणाचा डावा व उजवा कालवा संपूर्ण उन्हाळ्यात वाहता राहिल्याने धरण लाभार्थी बागायती पट्ट्याला मोठा आधार लाभला आहे.

पाटपाण्याचा मोठा आधार लाभला..!
राहुरीत मुळा व भंडारदरा धरणाचे कालवे वाहत असल्याने काहीशा प्रमाणात खरीप पेरणी झाली. पाटपाण्याचा आधार शेतकर्‍यांना लाभला, परंतु पावसावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांना पावसाच्या अपेक्षा लागलेल्या आहेत. पाऊस पडला तरच खरीप पेरण्यांना बळ लाभेल, अशी माहिती राहुरी कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी दिली.

राहुरीत निम्माच पाऊस..!
राहुरी कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 71 मिमी पावसाची अपेक्षा जून मध्ये असते, परंतु सरासरी केवळ 39 मिमी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा निम्मा पाऊस राहुरी परिसरात झाल्याचे दिसले आहे.

हेही वाचा

गोवा : को. रे.चा विद्युतीकरण मार्ग देशाला समर्पित

पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून हत्या

पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस येणार

Back to top button