जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत मोठी घट; पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली | पुढारी

जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत मोठी घट; पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली

संगमनेर : विशेष प्रतिनिधी

नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील एकूण पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली आलेला असून पूर्व मोसमी पावसाने जिल्ह्यात अद्यापही हजेरी लावली नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वांची चिंता वाढलेली असून आता मान्सूनच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी नगर जिल्ह्यासह नाशिक विभागात चांगल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली होती.

परिणामी वर्षभर शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालेला होता. यावर्षीच्या मोसमी पावसाकडे अर्थात मान्सूनकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. साधारणतः मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्व मोसमी पावसाचे नगर जिल्ह्यात आगमन होते. यावर्षीही हवामान विभागाने मोसमी पावसाच्या संदर्भात अंदाज व्यक्त केला होता.

मात्र आज जून महिना उजाडला आहे. तुरळक ठिकाणी पावसाने लावलेली हजेरी वगळता पूर्व मोसमी पाऊस अजून दाखल झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक पर्यंत येथे दोन – तीन दिवसात पाऊस व नगर जिल्ह्यात 7 जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.

आटपाडीजवळ अपघातात दोघांचा मृत्यू

जलअभ्यासक व सेवानिवृत्त अभियंता (निळवंडे प्रकल्प)जलसंपदा विभागाचे हरिश्चंद्र चकोर यांच्या म्हणण्यानुसार धरण क्षेत्रामध्ये जून अखेरपर्यंत मोसमी पाऊस मजल मारत असतो. 31 मे अखेर नगर जिल्ह्यातील धरणसाठा सरासरी 35 टक्क्यांच्या खाली आलेला आहे. हा साठा समाधानकारक मानला जातो. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेच्या मुळा धरणात एकूण 9 हजार 232 दशलक्ष घनफूट (35 टक्के) साठा आहे.

भंडारदरा धरणामध्ये एकूण 3 हजार 618 (32) पाणीसाठा शिल्लक आहे. निळवंडे धरणात 2 हजार 846 (37) साठा असून, आढळा धरणात एकूण 436 दशलक्ष घनफूट (41) पाणीसाठा, तसेच संगमनेर तालुक्यातील कायम दुष्काळी असलेल्या निमोण, तळेगाव परिसरासाठी काही अंशी वरदान असलेल्या भोजापूर मध्यम प्रकल्पात 8.30 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

दक्षिण नगर जिल्ह्याला पाण्याचा शेती सिंचनाचा लाभ देणार्‍या प्रमुख 11 धरणांपैकी सहा धरणांमध्ये वीस टक्क्यांहून अधिक कमी पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी नदी समूहातील पाण्याचा लाभ नगर जिल्ह्याला होत असला, तरीही बहुतांशी धरण पुणे जिल्ह्यातील आहेत. अन्य तीन धरणांमध्ये 45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

फ्रेंच ओपन : कोको गॉफ अंतिम फेरीत

जायकवाडी धरणात देखील एकूण 55.50 टीएमसी (54 टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा 29 टीएमसी (38 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. उजनी धरणामध्ये अवघा दीड टक्के (0.98 टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज पुरवणार्‍या कोयना धरणात सुमारे सोळा टक्के उपयुक्त (16 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे.

मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांची शेती सिंचनाची आवर्तने पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कालवे सध्या बंद आहेत. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात 802 क्युसेकने, तर कालव्यातून 772 क्युसेकने आवर्तन सध्या सुरू आहे. जून महिना सुरू झालेला असल्याने शेतकर्‍यांची पूर्व मशागतीची शेतीची कामे सध्या सुरू आहेत. सर्वांच्या नजरा आता मान्सूनच्या पावसाकडे लागून राहिल्या आहेत.

नगर जिल्ह्यातील 13 प्रमुख धरणांतील सरासरी एकूण पाणीसाठा 35 टक्क्यांहून कमी, तर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुमारे 25 टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी धरणे भरली, तसेच या वर्षीही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. या वर्षीदेखील नगर जिल्ह्यातील धरणे व नाशिक विभागातील धरणे पूर्ण क्षमतेने भरतील,

असा विश्वास वाटतो. तसेच सन 2022-2023 या कालावधीत निळवंडे धरणातून मुख्य कालव्यांमध्ये पाणी सोडण्याविषयी जलसंपदा विभागाकडून ठोस कारवाई नक्की होऊ शकते. जेणेकरून उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरेल, असा आशावाद निळवंडे धरण सेवानिवृत्त अभियंता हरिचंद्र चकोर यांनी म्हटले आहे.

 

Back to top button