किल्लेदारांचे गड शाबूत, सदस्यांची झुंज; गटरचनेवर महाविकास आघाडीची पकड | पुढारी

किल्लेदारांचे गड शाबूत, सदस्यांची झुंज; गटरचनेवर महाविकास आघाडीची पकड

संदीप रोडे

नगर : जिल्हा परिषदेची गट व पंचायत समितीची गण रचना प्रसिध्दीनंतर बहुतांश गटावर महाविकास आघाडीचे वर्चस्व असेल, असे चित्र समोर आले आहे. ‘किल्लेदारांचे’ तालुके शाबूत राहिले असले तरी बहुतांश विद्यमान सदस्यांना मात्र अस्तित्वासाठी झुंजावे लागणार आहे. मिनी मंत्रालयावर झेंडा फडकाविण्याचे महाविकास आघाडीचे मनसुबे दृष्टीपथास दिसत असले तरी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या चाचपणीने निवडणुकीची उत्कंठता वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सोपान गाठण्याकरीता भाजपला मात्र पराकष्टा करावी लागणार आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात नेत्यांनी फक्त तालुक्यापुरतेच पाहिल्याचे आजवरचे चित्र. त्यामुळेच त्यांना किल्लेदार असे संबोधले जाते. जिल्हा परिषदेच्या यावेळच्या निवडणुकीत 12 गट वाढवून गटांची संख्या 85 वर पोहचली. गट, गणांची रचना करताना मोठी उलथापालथ झाली. पण किल्लेदारांची तालुक्यावरील पकड कायम असल्याचे दिसते. मिनी मंत्रालयाच्या सभागृहात जाण्यासाठी सदस्यांना मात्र झुंजावे लागणार आहे. नेत्यांच्या वरदहस्ताशिवाय मिनी मंत्रालयाचा प्रवेश अशक्य असल्याचे नव्या रचनेतून समोर आले.

नगरपरिषद सभांचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार

नेवाशात मंत्री शंकरराव गडाख, पाथर्डीत आ. मोनिका राजळे, जामखेड-कर्जतवर आ. रोहित पवार, पारनेरात निलेश लंके, राहुरीत मंत्री प्राजक्त तनपुरे, संगमनेरात मंत्री बाळासाहेब थोरात, राहात्यात माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची पकड कायम असेल असे नव्या गट रचनेतून दिसते.

कोपरगावात वाढलेला चांदेकसारे गट राष्ट्रवादीचे आ. अशुतोष काळे यांच्या बालेकिल्ल्यात मोडतो. ब्राम्हणगाव गटाचे अस्तित्व संपले आहे. वारीतून सवत्संर हा नवा गट निर्माण झाला. त्यामुळे येथून राजेश परजणे यांची जिल्हा परिषद एन्ट्री सुखर झाली. भाजपचे कोल्हे व राष्ट्रवादीचे काळे यांच्यात अस्तित्वाची लढाई होईल, असे चित्र आहे. अकोल्यातही भाजपचे पिचड व राष्ट्रवादीचे आ. किरण लहामटे यांच्यात काटे की टक्कर होईल असेच चित्र आहे.

नगर तालुक्याचे त्रांगडे नव्या रचनेही कायम असल्याचे दिसते. नागरदेवळे गट वाढला असला तरी यापूर्वीच नागरदेवळे नगरपंचायत घोषित झाल्याने पुनर्रचनेची वेळ ओढावणार आहे. शिवसेनेचे संदेश कार्ले व शरद झोडगे यांच्या गटाची मोडतोड झाल्याने या दोघांनाही अस्तित्वासाठी झुंजावेच लागणार आहे. चिंचोडी पाटील गटातून नवा चेहरा दिसणार आहे. नेवाशातून भाजपचे विठ्ठलराव लंघे यांना पुन्हा एकदा नव्या गटातून लढाई लढावी लागणार आहे.

351 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला

बेलपिंपळगाव हा हक्काचा गट सोडून गतवेळी त्यांनी कुकाणा गटातून कन्या तेजश्रीला जिल्हा परिषदेत पाठविले, आता तोच कुकाणा गट संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना नव्या गटातून नशीब अजमावे लागणार आहे. त्यासाठीही त्यांना ‘राजकीय तह’ करावे लागतील असे चित्र आहे. सभापती सुनील गडाख यांच्या गटाचे खरवंडीऐवजी शिंगणापूर असे नामकरण झाले.

पाचेगाव गट नव्याने अस्तित्वात आला तरी त्याला करजगाव गण जोडला गेल्याने मंत्री गडाख यांचा शब्द तेथे ‘प्रमाण’ असणार आहे. जामखेडमध्ये साकत गट वाढला असला तरी तेथेही आ. पवारांचे प्राबल्य दिसेल. कर्जतमध्ये मात्र मोठी उलथापालथ झाली. एकाच गटात अनेक पक्षाचे मातब्बर आल्याने चुरशीची लढाई अनुभवयास मिळेल.

विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी असले तरी जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम मानून किल्लेदार जिल्हा परिषदेची लढाई लढतील, यात शंका नाही. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यावरील वर्चस्व सिध्दीची लढाई नेत्यांसाठी सोपी असली तरी नव्या रचनेमुळे सदस्यांची मात्र दमछाक होईल, असेच चित्र दिसते आहे.

इस्लामपूर : ‘कृष्णा’तर्फे मोफत घरपोच साखर

श्रीगोंदा जगतापांना सोईचा, वाखारेंची अडचण

श्रीगोंदा तालुक्यात माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावात पिंपळगाव पिसाचा नवा गट अस्तित्वात आल्याने डॉ. प्रणोती यांना संधी मिळाणार आहे. माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्नुषा सुवर्णा यांचा मांडवगण, अनुराधा नागवडे यांचा बेलवंडी तर आ. पाचपुते यांचा काष्टी गट शाबूत राहिला आहे. कोमल वाखारे यांचा येळपणे गट संपुष्टात येऊन त्याचा गण झाला, तोही नागवडे यांच्या बेलवंडी गटात गेला आहे. त्यामुळे वाखारे यांना आता नव्या गटाची शोधाशोध करावी लागणार आहे. लिंपणगाव हा नवा गट निर्माण झाल्याने येथून नवा चेहरा जिल्हा परिषदेत दिसणार आहे.

राष्ट्रवादीला संधी, सेनेची उडी, भाजपची कसरत

जिल्हा परिषदेच्या संपलेल्या टर्ममध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 23 सदस्य असले तरी त्यातील 13 विखेंना मानणारे आहेत. त्यामुळे 18 सदस्य असलेल्या राष्ट्रावादीला पुन्हा नंबर वन’ची संधी असणार आहे. रचनाही त्यांच्यात पथ्यावर पडल्याचे दिसते. भाजपला 14 संख्याबळावरून पुढे उडी मारण्याची कसरत करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते. सेनेची सात सदस्य संख्या यंदा मात्र दोन आकडी संख्या पार करेल. मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे सेनेची धुरा गेल्याचा तो परिणाम असेल. गतवेळी अपक्षांचा असलेला 3 आकडा नव्या मोडतोडीत घटेल असे दिसते.

Back to top button