नगर : डंपर, पोकलेनसह 52 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोदावरी नदीपात्रात गौण खनिज चोरी | पुढारी

नगर : डंपर, पोकलेनसह 52 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोदावरी नदीपात्रात गौण खनिज चोरी

नगर : पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूचा उपसा करणार्‍या दोघांना गजाआड करून, श्रीरामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून डंपर, पोकलेसह 52 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अमोल बाबासाहेब कराळे (31, रा. रोटी बस्ती, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) व अनुपकुमार मिस्त्री प्रसाद (24, रा.महरेई, महाई, बलिया, चितबडागाव, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. गोदावरी नदीपात्रात काही इसम पोकलेनच्या साहाय्याने डंपरमध्ये विनापरवाना वाळू उपसा करुन भरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कटके यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. पोकलेनच्या साहाय्याने हायवामध्ये वाळू उपसा करून भरली जात होती. त्यांच्याकडे वाळूउपसा व वाहतुकीचा परवाना नव्हता. पोलिस नाईक शंकर संपतराव चौधरी यांनी भादंवि कलम 379, 511, 34 सह पर्यावरण कायदा कलम 3, 15 प्रमाणे फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

 

 

Back to top button