दहा नगरपालिकांच्या हरकतींवर होणार दोन दिवस सुनावणी | पुढारी

दहा नगरपालिकांच्या हरकतींवर होणार दोन दिवस सुनावणी

नगर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या प्रभागरचनेवर नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत. दाखल झालेल्या हरकतींवर 20 मे व 23 मे या दोन दिवशी सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे सुनावणी घेणार असून, त्यानंतर या हरकतींवरील अभिप्राय विभागीय आयुक्त व राज्य निवडणूक आयोगालाकडे पाठविणार आहेत.
संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपालिकांचा कालावधी डिसेंबर 21 मध्ये, तर जामखेड व शेवगाव या दोन नगरपालिकांचा कालावधी जानेवारी 2021 मध्ये संपला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम सुरु असून, 10 ते 14 मे या कालावधीत नागरिकांकडून प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे सुनावणीनंतर श्रीरामपूर, संगमनेर व कोपरगाव या तीन ब वर्ग नगरपालिकांच्या हरकतींवरील अभिप्राय राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत. राज्य निवडणूक आयोग 6 जून 2022 पर्यंत अंतिम प्रभागरचनेस मान्यता देणार आहेत.
राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, जामखेड, शेवगाव या क वर्ग नगरपालिका व नेवासा नगरपंचायत यांच्या हरकती व सूचनांचा अभिप्राय जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे विभागीय आयुक्त यांच्याकडे अंतिम प्रभागरचनेसाठी पाठविणार आहेत. या सर्व नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना 6 जून 2022 पर्यंत पूर्ण होणार असून, ही अंतिम प्रभागरचना 7 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित नगरपालिकांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणार आहेत.
या पालिकांची होणार सुनावणी
20 मे रोजी -श्रीरामपूर, कोपरगाव, जामखेड, शेवगाव व नेवासा
23 मे रोजी – संगमनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा

Back to top button