नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २६) मतदान पार पडणार आहे. निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात असून, मतपत्रिकेवर मतदान घेण्यात येईल. विभागीय महसूल प्रशासनाला मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. मतपत्रिका गुलाबी रंगाची असून, आकार आडवा आहे. त्यावर उमेदवाराचे नाव, छायाचित्र व राजकीय पक्षाचा उल्लेख करण्यात आला आहे.
शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आरोप-प्रत्याराेपांच्या फैरी झडत आहेत. राजकीय वातावरण ढवळून निघत असताना प्रशासन मतदानाच्या तयारीत गुंतले आहे. त्यामध्ये मतपत्रिकांपासून ते आवश्यक मतपेट्या व साहित्याची जुळवाजुळव केली जात आहे.
विभागीय आयुक्त प्रशासनाला मतदानाच्या दृष्टीने नुकत्याच मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. मुंबई येथील चर्नी रोडच्या शासकीय प्रिटिंग प्रेसमध्ये मतपत्रिकांची छपाई करण्यात आली. उमेदवारांची संख्या व मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा आडव्या आकारातील गुलाबी रंगात मतपत्रिकांची छपाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आडव्या मतपत्रिकेवर डाव्या हाताला १ ते ११ उमेदवारांची नावे आहेत. मतपत्रिकेच्या मधोमध पाच मिमीची जाड रेषा असून, उजव्या हाताला १२ ते २२ उमेदवारांच्या नावांची छपाई केली गेली आहे. मतपत्रिकेवर सर्वप्रथम अनुक्रमांक, उमेदवारांचे नाव (मराठी व इंग्रजी भाषेत), पक्ष, छायाचित्र व पसंती क्रमांकांसाठीची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा: