नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू झाल्यानंतर नाशिक-बंगळुरू विमानसेवा सुरू करावी या मागणीला यश आले आहे. इंडिगो एअर लाइन्सकडून येत्या १० सप्टेंबरपासून दररोज नाशिक-बंगळुरू विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. अवघ्या एक तास ५० मिनिटांत नाशिकहून बंगळुरू गाठणे शक्य होणार असल्याने, व्यापार, उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
इंडिगो एअरलाइन्सने नाशिकच्या ओझर विमानतळावरून विविध शहरांना जोडणाऱ्या सेवा सुरू करून नाशिकच्या विमानसेवेला ऊर्जितावस्था दिली आहे. सद्यस्थितीत इंडिगोकडून दिल्लीसह नागपूर, इंदूर, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद या शहरांना थेट जोडणारी विमानसेवा दिली जात आहे. आता त्यात बंगळुरू या महत्त्वपूर्ण शहराचीदेखील भर पडणार आहे. येत्या १० सप्टेंबरपासून बंगळुरू येथून दुपारी २.३० वाजता विमान उड्डाण घेणार असून, सायं. ४ वाजून २० मिनिटांनी ते नाशिकमध्ये दाखल होणार आहे. तसेच नाशिकहून सायं. ४ वाजून ५० मिनिटांनी विमान उड्डाण घेणार असून, सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी बंगळुरू येथे दाखल होणार आहे. ही सेवा दररोज सुरू राहणार असून, नाशिककरांना अवघ्या दोन तासांत बंगळुरू गाठणे शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली होती. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून, इंडिगोकडून आता आपल्या सेवेचा आणखी विस्तार केला आहे. नाशिक-बंगळुरू विमानसेवेलादेखील उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास इंडिगोकडून व्यक्त केला जात आहे.
नाशिक-बंगळुरू विमानसेवेचा सर्वाधिक फायदा व्यापार, उद्योग क्षेत्राला होणार आहे. त्याचबरोबर आयटी उद्योगांच्या दृष्टीनेदेखील ही विमानसेवा फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यापार, उद्योग क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
नाशिक-बंगळुरू विमानसेवेमुळे नाशिकच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठी बळकटी मिळणार आहे. विशेषत: आयटी उद्योगाला या विमानसेवेचा मोठा फायदा होणार आहे. नाशिकची विमानसेवा आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून, नाशिकच्या सेवेचा विस्तार करणे हे आमचे ध्येय आहे. – मनीष रावल, अध्यक्ष, एिव्हएशन कमिटी, निमा.
हेही वाचा: