[author title="नाशिक : निल कुलकर्णी" image="http://"][/author]
रक्तदान जीवनदान आहे. ते सर्वार्थाने मानवतेचेच कार्य आहे. रक्तदान करून अनेकांशी रक्ताचे नाते जोडता आले याचे समाधान आहे. दात्यांनी या चळवळीत पुढे येऊन मानवतेच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन रक्तदानात विक्रमवीर ठरलेल्या आणि १०० हून अधिक वेळा रक्तदान केलेल्या दात्यांनी जागतिक रक्तदाता दिनाच्या औचित्यावर व्यक्त केले.
दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. या दिवसाला यंदा २० वर्षे पूर्ण झाल्याने 'रक्तदानाची २० वर्षे' ही यंदाच्या रक्तदाता दिनाची संकल्पना आहे. एबीओ रक्तगट पद्धतीचा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लॅंडस्टेनर यांचा जन्मदिनही १४ जून रोजी आहे.
दि. २६ फेब्रुवारी १९८३ रोजी पहिले रक्तदान केले. आज ४० वर्षे झाली रक्तदान करत आहे.
१०१ वेळा रक्तदान करून मानवतेच्या कार्यात योगदान देत आहे. पूर्वी चित्रपटासारखे रक्तदान केल्या केल्या तत्काळ रुग्णाला काही तपासणी करून तत्काळ रक्त चढवले जात होते. तोही अनुभव रक्तदानाच्या वेळी घेतला. रक्तदानाचे अनेक हृदयस्पर्शी प्रसंग मनावर काेरले आहेत. अनेकांशी रक्ताचे नाते जोडता आले. तरुणाईने उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे. – रमाकांत मंत्री, विक्रमवीर रक्तदाते, मनमाड.
जगभरातील रक्तदात्यांकडून मानवी जीवनरक्षणात होत असलेल्या योगदानाबद्दल कौतुक करणे आणि रक्तदान चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करणे, हे यंदाच्या वर्षातील रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट आहे. रक्तदानाचा रुग्णावर तसेच दात्यांवर होणारा महत्त्वपूर्ण प्रभाव याचा उहापोह यंदाच्या रक्तदाता दिनानिमित्त केला जाणार आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी पहिले रक्तदान केले. त्यानंतर दर तीन महिन्यांनी रक्तदान केले.
सुरुवातीला आई-वडिलांचा विरोध होता. 10व्या रक्तदानानंतर वडिलांनी रक्तदानास विरोध करत पुन्हा कधीच करायचे नाही अशी तंबीच दिली हाेती. तरीही रक्तदान सुरूच ठेवले. ५० वे रक्तदान केल्यावर वृत्तपत्रात आलेल्या बातम्या बघून वडिलांनाही आनंद झाला होता. २०१४ ला माझे रक्तदान शतक झाले. परंतु ते बघण्यास वडील नव्हते. आईने रक्तदान शंभरी बघितली याचे समाधान आहे. – दिलीप कोठावदे, विक्रमी रक्तदाते, नाशिक.