शिक : पुढारी वृत्तसेवा – सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यापैकी एक म्हणजे गुन्हेगारांना ठराविक कालावधीपर्यंत शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. त्यानुसार चालू वर्षात शहरातील ७२ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी ४० गुन्हेगार पुन्हा शहरात वास्तव्य करताना आढळून आले. त्यामुळे हद्दपारीची कारवाई कागदावर आणि वावर गावभर अशी परिस्थिती शहरात आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार वारंवार समज देऊनही गुन्हेगारी कृत्य न थांबवल्यास संबंधित गुंडावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार काही दिवस ते दाेन वर्षांपर्यंत शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. हद्दपारीच्या कालावधीत संबंधित गुन्हेगारांना शहरात व जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करता येत नाही. त्यांना प्रवेश पाहिजे असल्यास संबंधित पोलिसांची, न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. विनापरवानगी प्रवेश केल्यास किंवा वास्तव्य केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केली जाते. त्यानुसार चालू वर्षात शहरात शांतता कायम राहावी यासाठी खबरदारी म्हणून शहर पोलिसांनी ७३ गुन्हेगारांना शहरासह जिल्ह्यातून हद्दपार केले. त्यात सराईत गुन्हेगारांसोबतच नायलॉन मांजा विक्रेते, गोमांस विक्रेते, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी ठराविक कालावधीपर्यंत तडीपार केले. तडीपार केल्यानंतर त्यांचा वावर शहरात होत नसल्याची खात्री करण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय व गुन्हे शाखेतर्फे नियमित तपासणी मोहीम राबवली जाते. त्यात ४० हद्दपार गुन्हेगार विनापरवानगी शहरात फिरताना आढळून आले. त्यापैकी काही गुन्हेगारांकडे घातक शस्त्रे आढळून आली, तर काही हद्दपार गुन्हेगारांचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळून आला. त्यामुळे अशा हद्दपारांना पकडून त्यांच्याविराेधात गुन्हे दाखल केले आहेत.
हद्दपार केलेल्या गुन्हेगारांचे शहरात वास्तव्य, वावर नसल्याची खात्री करण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवली जाते. हद्दपार शहरात आढळून आल्यास त्यास तातडीने अटक करून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे शहरात विनापरवानगी फिरणाऱ्या हद्दपार गुन्हेगारांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. – संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.
महाराष्ट्र पोलिस कायदा ५५ नुसार गुंड, दरोडा- घरफोडी करणाऱ्या टोळ्यांमधील १२ जणांना हद्दपार केले. तर ५६ नुसार ज्याच्याविरुद्ध दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत तसेच ती व्यक्ती घातक कारवाई करण्याची शक्यता असेल अशा ५४ जणांना हद्दपार केले. तसेच कलम ५७ नुसार तुरुंगवास भोगलेल्या किंवा जामीनावर सुटलेल्या ७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे.
एखाद्या व्यक्ती विरोधात हाणामाऱ्या करणे, धमक्या देणे, खंडणी वसूल करणे, दंगल माजविण्याचा प्रयत्न करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असतील तर अशा व्यक्तिविरोधात पोलिस हद्दपारीची कारवाई करतात. तसेच गुंड प्रवृत्तीची व्यक्ती एखाद्या गावात किंवा आसपासच्या गावात गुन्हेगारी करत असेल, तर त्यास त्या जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. तडीपारी ही त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा नसून संशयित आरोपीने नवीन गुन्हे करून नये, यासाठी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई असते. थोडक्यात सामान्य नागरिकाला सुरक्षित वाटावे, सामाजिक शांतता राहावी यासाठी गुन्हेगारांना हद्दपार केले जाते.
हेही वाचा: