नाशिकमध्ये अवघ्या दहा दिवसानंतर पुन्हा गॅसपाइपमधून गळतीचा प्रकार सुरूच; नागरिकांमध्ये घबराट

सिडको : खोडे मळ्यात गॅस पाइपलाइन लिकेज दुरुस्ती करताना कर्मचारी.
सिडको : खोडे मळ्यात गॅस पाइपलाइन लिकेज दुरुस्ती करताना कर्मचारी.
Published on
Updated on

सिडको, नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सिडको भागात 'एमएनजीएल'ने टाकलेल्या गॅसपाइपमधून गळतीचा प्रकार सुरूच आहे. अंबड येथील फडोळ मळा परिसरात ड्रेनेज पाइपलाइन टाकताना गॅसलाइन फुटल्याचा प्रकार दहा दिवसांपूर्वीच घडला होता. पुन्हा असाच प्रकार जुने सिडकोलगत असलेल्या खोडे मळा परिसरात घडला. गॅसचा वास परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रात्री तीन तासांत व्हॉल्व्ह दुरुस्त केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सिडको भागात खासगी एमएनजीएल गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. बहुतांश काम पूर्ण झाले आहे. अजूनही अनेक नागरिकांच्या घरांमध्ये थेट गॅस पाइपलाइन देण्यात आलेली नाही. परंतु, खासगी कंपनीच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या गॅस पाइपलाइनमध्ये गॅस भरण्यात आलेला आहे. नागरिकांना कनेक्शन देण्यासाठी काही ठिकाणी गॅस पाइपला झाकण लावून व्यवस्था केली आहे. खोडे मळा या ठिकाणी अशाच प्रकारे एका सोसायटीच्या इमारतीला गॅसजोडणी देण्यासाठी पाइपलाइन काढून ठेवण्यात आलेली आहे. त्यावर गाडी जाऊन गॅस पाइपलाइनला गळती झाल्याचा प्रकार शनिवारी (दि.८) रात्री दहाच्या सुमारास घडला. याबाबत स्थानिक विजय खोडे, ललित भडांगे, प्रशांत जाधव, मधुकर पाटील, संजय नाईक यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, अधिकाऱ्यांना घटनास्थळी येण्यास विलंब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पथकाने पाइपलाइनमधील एअर काढून ती बंद केली. यानंतर तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर व्हॅल्व्ह दुरुस्ती पूर्ण झाली.

दहा दिवसांपूर्वीच फडोळ मळा परिसरात मनपाच्या जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असताना गॅसपाइप लिकेज झाली होती. प्रत्यक्षात गॅसपुरवठा झालेला नसतानाच गळतीच्या घटना घडत असल्याने प्रत्यक्ष घराघरांत गॅसजोडणी दिल्यानंतरच्या सुरक्षिततेचे काय होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

एमएनजीएल कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना थेट घरात गॅस कनेक्शन देण्यासाठी संपूर्ण परिसरात गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामावर कुणाचाही अंकुश नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. कंपनीने व्हॉल्व्ह तपासावेत. – प्रशांत जाधव, सामाजिक कार्यकर्ता.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news