खा. सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या? | पुढारी

खा. सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या?

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : खा. सुनील तटकरे यांनी स्वतःच्या कुटुंबीयांसाठी व स्वतःसाठी विधानपरिषदेची जागा घेतली. विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला मिळायला हवी म्हटल्यावर त्यांना मिरच्या का झोंबल्या, असा सवाल करीत आ. भास्कर जाधव यांनी खा. तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली.

आपल्या संपर्क कार्यालयात आ. जाधव यांची मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी आ. जाधव यांनी कडाडून टीका केली. खा तटकरेंनी खोट्या कंपन्या स्थापन करून सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावल्या असल्याचे आरोप झाले आहेत. त्यांनी 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यामुळे कोकणातील ते सगळ्यात खोटारडे नेते आहेत असा हल्ला चढविला.

जाधव म्हणाले की, तटकरेंचे माझ्यावर कोणतेही उपकार नाहीत, उलट मीच त्यांना दिल्ली दाखवली आहे. त्यामुळे जाण, जाणीव व नीनिमत्ता नसलेल्या या महान नेत्याला मी काय मार्गदर्शन करणार अशी खोचक टीका आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

आ. जाधव म्हणाले की, खेड तालुक्यातील आंबडस येथील मेळाव्यात 2024 मध्ये होणार्‍या विधानपरिषदेच्या निवडणूकीत कुणबी समाजाला ही जागा मिळावी, अशी आपली मागणी असल्याचे म्हटले होते. यात कुणबी समाजाचा अपमान करण्याचा प्रश्नच नव्हता. कुणबी समाजाच्या मातृसंस्थेला राज्य सरकारने दिलेल्या 5 कोटी निधीचे मी समर्थन केले होते. आणखी मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला हवी म्हटल्याचे तटकरेंना का झोंबले? यात कुणबी समाजाचा कोणता अपमान आला उलट ती जागा कुणबी समाजाला दिल्यास सन्मानच होईल. खा. तटकरे यांनी स्वतःसाठी, मुलग्यासाठी, पुतण्यासाठी विधान परिषद मिळवली.

घरात मुलगीसाठी मंत्रीपदही घेतले. त्यांना केवळ लोकांचे घेण्याची सवय आहे. देण्याची तर अजिबात नाही. नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे लावायचे आणि स्वतः मात्र कुटुंबवादी त्यामुळे आता विधान परिषद कुणबी समाजाला द्या म्हणजे समाजाचा सन्मानच होईल.. खासदारकी, मंत्रीपद, विधान परिषद सगळंकाही आपल्या कुटुबांतच ठेवायचे, ही त्यांची मनोवृत्ती. उलट कुणबी समाजाला उमेदवारी देण्याचे टाळून त्यांनी या समाजाचा अपमान केलाय. खोट्या कंपन्या स्थापन करून हजारो कोटीची माया जमवल्याचे त्यांच्यावर आरोप झाले आहेत.

राजकारणात ज्यांनी ज्यांनी तटकरेंना सहकार्य केलं. त्यांची तटकरेंनी माती केली आहे. केलेल्या उपकाराची त्यांना कसलीच जाणीव नाही. त्यामुळे सहकार्याची जाणीव, नितीमत्ता नसलेल्या महान नेत्यांना मार्गदर्शन करणे आपल्या कुवतीबाहेर आहे. तुम्ही राष्ट्रवादीचे फाउंडर नाही तुंम्ही काँग्रेस मधून आलात मात्र लोकांची फसवणूक करता. माजी आ नाना जोशी यांनी तुम्हाला ना. भुजबळ साहेब यांच्याकडे नेले ज्यांनी तुंम्हाला सहकार्य केले त्यांची तुम्ही माती केली. बॅ. अंतुले, माणिक जगताप, रवी पाटील, आर टी घरत, बंधू पायील, जयंत पाटील, पंडित पाटील यांनी अनुभव घेतला आहे. त्यांची भाषणे बघा. आता पक्षाने संधी दिल्यास रायगडला जाणार आहे, असे आ. जाधव यांनी सांगितले.

ते म्हणाले की, रत्नागिरीसाठी हक्काची असलेली विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला मिळावी, ही आपली भुमिका असल्याचे मतही आ जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी गुहागरचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, जि.प.सदस्य महेश नाटेकर, माजी सभापती पप्या चव्हाण, फैसल कास्कर, राजू भागवत उपस्थित होते.

Back to top button