नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा खालावला आहे. जिल्ह्यातील २४ प्रमुख धरणांत केवळ २९.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात निम्म्याहून कमी साठा उपलब्ध आहे. धरणांची पाणीपातळी खालावल्याने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
जिल्ह्यात यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा अधिक आहे. तापमानाचा पारा थेट ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. परिणामी अवघ्या जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेसाेबत धरणांच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. आजमितीस प्रमुख धरणांमध्ये केवळ १९ हजार ५९२ दलघफू जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणे ४५ टक्के भरलेली होती. त्यावेळी एकूण उपयुक्त साठा २९ हजार ६१९ दलघफूवर होता. म्हणजेच २०२३ च्या तुलनेत यंदा जनतेला उन्हाच्या तीव्र झळांसोबतच दुष्काळाचे चटकेदेखील सहन करावे लागत आहेत.
नाशिककरांना पाणी पुरवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ २६२६ दलघफू (४६.४६ टक्के) साठा शिल्लक आहे. धरणातील उपलब्ध साठा आणि मान्सूनसाठीचा अवधी बघता शहरात आतापासून अघोषित पाणीकपात केली जात आहे. त्यामुळे उपनगरांमधील जनतेची सारी भिस्त टँकरवरच अवलंबून आहे. दुसरीकडे शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक भयावह चित्र आहे. धरणांत मर्यादित जलसाठा शिल्लक आहे. त्याचवेळी पावसाअभावी चालूवर्षाच्या प्रारंभीच पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले. त्यामुळे ग्रामीण जनतेवर पाण्याकरिता डोक्यावर हंडा घेऊन वणवण फिरायची वेळ ओढावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने चालूवर्षी चांगल्या मान्सूनचा अंदाज वर्तविला आहे. पण, मान्सूनसाठी अद्यापही दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता बघता त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चार धरणे कोरडीठाक
जिल्ह्यातील चार धरणे आताच कोरडीठाक पडली आहे. नागासाक्या व पुणेगाव धरणांतील साठा शून्यावर पोहोचला आहे. तिसगाव तसेच भोजापूरमध्ये अनुक्रमे 3.96 व 6.93 टक्के साठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता बघता लवकरच अन्य काही धरणे तळ गाठण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे.
धरणांची स्थिती
धरण साठा (दलघफू) टक्के
गंगापूर 2626 46.64
दारणा 1754 24.53
काश्यपी 826 44.60
गाैतमी-गोदावरी 675 36.13
आळंदी 260 31.86
पालखेड 344 52.68
करंजवण 1042 19.40
वाघाड 379 16.46
ओझरखेड 347 16.29
भावली 188 13.11
मुकणे 2200 30.39
वालदेवी 481 42.45
कडवा 348 20.62
नांदुरमध्यमेश्वर 229 89.11
चणकापूर 571 23.53
हरणबारी 451 38.68
केळझर 101 17.66
गिरणा 5742 31.04
पुनद 951 72.82
हेही वाचा: