Weather News : राज्यात पुन्हा थंडीची लाट; अवकाळी पाऊसाचा काढता पाय
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आता कमी झाला असून, आता हवामान कोरडे राहणार आहे. परिणामी, राज्यात पुन्हा थंडी वाढणार आहे, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दक्षिण भारतातील तामिळनाडूसह केरळ आणि आसपासच्या भागांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहिल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती.
आता मात्र राज्यातील सर्वच भागांतील अवकाळी पाऊस कमी झाला असून, हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे उत्तर भारताकडून येणार्या थंड वार्यास अनुकूल स्थिती तयार होणार आहे. यामुळे राज्याच्या सर्वच भागांत थंडी वाढणार आहे. केरळच्या किनारपट्टीवर चक्रीय स्थिती कायम आहे. या स्थितीमुळे दक्षिण भारतातील केरळसह तामिळनाडू या राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रावात सक्रिय आहे. त्यामुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडलेली आहे.
या भागाकडून राज्याकडे पुन्हा थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यात थंडी वाढणार आहे. तसेच राज्याच्या सर्वच भागांत हवामान कोरडे राहणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी राज्यात महाबळेश्वर येथे 14.2 एवढे नीचांकी तापमान नोंदले गेले आहे.
हेही वाचा