पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जुलै अखेरीस असलेली सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७० वरुन ६ ऑगस्ट रोजी ११५ पर्यंत वाढली आहे. गेल्या सोमवारी राज्यातील रुग्णांची संख्या १०९ होती. आकडेवारीनुसार, राज्यातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण मुंबईत आहेत. येथील सक्रिय रुग्णांची संख्या ४३ आहे. त्यानंतर पुण्यात ३४ आणि ठाण्यात २५ रुग्णांची नोंद झाली आहे. रायगड, सांगली, सोलापूर, सातारा आणि पालघरमध्ये सध्या प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे. दरम्यान, राज्यात काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढीमागे ब्रिटनमध्ये वेगाने फैलावणारा कोरोनाचा नवीन व्हेरियंट EG.5.1 अथवा Eris कारणीभूत असल्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (COVID variant Eris)
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट EG.5.1 अथवा Eris हा वेगाने फैलावत आहे. EG.5.1 चे कोड नाव Eris आहे. या नवीन कोरोना स्ट्रेनमुळे ब्रिटन आणि अमेरिकेत रुणांची संख्या वाढत आहे. EG.5.1 हा Omicron XBB.1.9 चा सब-स्ट्रेन आहे.
आरोग्य तज्ञांच्या मते, कोरोनाच्या XBB.1.16 आणि XBB.2.3 या व्हेरिएंटचा महाराष्ट्राला धोका आहे. एरिस व्हेरिएंटचे अस्तित्व मे पासून भारतात आहे. महाराष्ट्रात काही प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढीला हा व्हेरिएंट कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
"मे महिन्यात महाराष्ट्रात EG.5.1 व्हेरिएंट आढळून आला होता. आतापर्यंत एरिसमुळे देशात रुग्ण वाढलेले नाही." असे महाराष्ट्राच्या जीनोम सिक्वेन्सिंगचे समन्वयक आणि बीजे मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी द टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले आहे. "हा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर दोन महिने उलटून गेले आहेत आणि जून आणि जुलैमध्ये कोरोना रुग्णसंख्येत कोणतीही लक्षणीय वाढ झाली नसल्यामुळे या सब- व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही," असे डॉ. कार्यकर्ते यांनी पुढे म्हटले आहे. "पण रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडे लक्ष ठेवावे लागेल." असेही त्यांनी नमूद केले.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या माहितीनुसार, EG.5 व्हेरिएंटमुळे आता अमेरिकेत नवीन COVID-19 चा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ब्रिटनच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सीची नवीन आकडेवारी असे सूचित करते की एकूण कोरोना रुग्णसंख्येत एरिस व्हेरिएंट संसर्गाचे प्रमाण १४.६ टक्के आहे. (COVID variant Eris)
खोकला, सर्दी, ताप, घसा दुखणे आणि छातीत अवघडल्यासारखे वाटणे ही Eris व्हेरिएंटची लक्षणे आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हात स्वच्छ धुणे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करायला हवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. यामुळे इतर व्हायरल आणि काही बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. संतुलित आहार घ्या.
हे ही वाचा :