पुणे : पुढारी वृत्तसेवा : शाळांना सुट्या लागल्यामुळे लहान मुलांना मुक्तपणे बागडण्याची मोकळीक मिळाली आहे. सोसायट्या आणि
वस्त्यांमध्ये दिवसभर मुले खेळण्यात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे. शाळेला सुटी लागल्यामुळे खेळांशी गट्टी जमली असली, तरी उन्हाळ्यात मुलांच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. यंदा शहरात सकाळी 10-11 वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात होत आहे.
दुपारी 12 ते 4 या कालावधीत तर सूर्य मी-मी म्हणत आहे. दुसरीकडे सोसायट्या, वस्त्या, बैठी घरे, कॉलनी अशा सर्वच ठिकाणी लहान मुलांचे खेळ रंगत आहेत. मुले खेळात रमल्यावर त्यांना ऊन, पाऊस, थंडीचा विसर पडतो. सातत्याने उन्हात खेळल्यामुळे डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे, उलट्या होणे आदी त्रास मुलांना होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत मैदानी खेळ खेळावेत आणि दुपारच्या वेळी बैठे खेळ खेळावेत किंवा थोडी विश्रांती घ्यावी, असे नियोजन पालकांना करता येऊ शकते.
मुलांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त द्रवपदार्थांचा समावेश करावा. सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड कॉफीऐवजी फळांचा रस, ताक, उसाचा रस यांची निवड करावी. मुलांना उन्हात खेळायला पाठविणे शक्यतो टाळावे. दुपारच्या वेळी बाहेर जाताना टोपी, गॉगल, पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत.
– डॉ. मनीष पाटील, बालरोगतज्ज्ञ
काय काळजी घ्यावी?
मुलांना बाहेर खेळायला जाताना पाण्याची बाटली सोबत नेण्यास सांगावे.
भर दुपारी उन्हात खेळणे टाळावे.
फ्रिजमधील पाणी पिऊ नये. तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत.
पर्यटनाला शक्यतो भरपूर झाडे, पाणी अशा ठिकाणी घेऊन जावे.
उष्माघाताशी संबंधित लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.