…‘तो’ येतोय… त्याला पाहायला तयार राहा! 50 हजार वर्षांनंतर पृथ्वीच्या दिशेने येणारा धूमकेतू पाहण्याची संधी

…‘तो’ येतोय… त्याला पाहायला तयार राहा! 50 हजार वर्षांनंतर पृथ्वीच्या दिशेने येणारा धूमकेतू पाहण्याची संधी

Published on

अलताफ कडकाले

नगर : नवीन वर्षाच्या फेब्रुवारीच्या सुरुवातीला अंतराळात एक अद्भुत दृश्य पाहायला मिळणार असून, आपल्या जीवनात पहिल्यांदा आणि शेवटचा पृथ्वीच्या दिशेने धूमकेतू येत आहे. त्याला आपण उघड्या डोळ्यांनी पाहता येणार असून, उत्तर दिशेला सप्तर्षींच्या जवळ आकाशात हा दिसणार आहे. त्यामुळे ही अवकाशीय घटना पाहायला कोणीही विसरू नका, असे सोलापूर विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल दास यांचे म्हणणे आहे.

हा धूमकेतू 'नियांडरथल' या आदिमानवाच्या युगात दिसला होता, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. 50 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच सूर्यमालेच्या म्हणजेच पृथ्वीच्या दिशेने धूमकेतू येत आहे. हा धूमकेतू पृथ्वीजवळून जाणार आहे. वैज्ञानिकांमध्ये देखील याबाबत मोठी उत्सुकता आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, या धूमकेतूचे नाव सी/2022 ई 3 (झेडटीएफ) असे आहे. हा धूमकेतू फेब्रुवारीच्या 1 किंवा 2 तारखेला अवकाशात दिसणार आहे. ते दृष्य दुर्बिणीशिवाय पाहण्याची संधी आहे.

कॅलिफोर्नियाच्या झ्विकी ट्रान्झियंट फॅसिलिटीच्या शास्त्रज्ञांनी मार्च 2022 मध्ये हा धूमकेतू शोधला आणि तेव्हापासून ते त्याचा मागोवा घेत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, 1 किंवा 2 फेब्रुवारी रोजी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सुमारे 42 दशलक्ष किलोमीटर असेल. म्हणजेच पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. सध्या हा धूमकेतू सूर्यमालेच्या आतील भागातून जात आहे. 12 जानेवारीला ते सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचेल. त्यानंतर 1 किंवा 2 फेब्रुवारीला पृथ्वीच्या सर्वात जवळून जाईल. या धूमकेतूपासून पृथ्वीला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

हा धूमकेतू फिक्कट हिरव्या रंगाचा
हा धूमकेतू सूर्यमालेला भेट देत असून, तो फिक्कट हिरव्या रंगाचा आहे. उघड्या डोळ्यांनी धूमकेतूंचे दर्शन अभावानेच होते. म्हणजे माणसाच्या आयुष्यात म्हणजे तीन-चार वेळाच अशी संधी येते. तीसुद्धा सर्व योग जुळून आल्यावर. धूमकेतू सूर्याभोवती भ्रमण करतात; परंतु त्यांच्या कक्षा कित्येक अब्ज किलोमीटर लंबवर्तुळाकार असतात. त्यामुळे धूमकेतू त्याचे अस्तित्व असेपर्यंत ठरावीक कालावधीने सूर्याला आणि परिणामी आपल्या सूर्यमालेला भेट देत असतात.

आकाशात कुठे पाहाल?
सध्या हा धूमकेतू सूर्यमालेत असून, तो पृथ्वीवरून आकाशात उत्तर दिसेल. सप्तर्षींच्या जवळ रात्री 8.30 वाजता उगवत असून, रात्री नऊ वाजल्यानंतर चांगला दिसून येतो. त्यामुळे रात्री नऊच्या नंतर त्याला पाहणे चांगले आहे.

हॅलेसारखा धूमकेतू 75 ते 79 वर्षांनी दिसतो
हॅलेसारखा धूमकेतू साधारण 75 ते 79 वर्षांनी भेट देत असतो. अशा वेळी पृथ्वीचे स्थान, धूमकेतूचा आकार, त्याचे सूर्याला वळसा घालून जाणे, त्याचे शेपूट सूर्याच्या उष्णतेने फुलणे आणि हे सर्व होताना आकाश स्वच्छ असणे – पावसाळा नसणे वगैरे असे सर्व जुळून आले तर खगोलातील या अत्यंत सुंदर गोष्टीचे साध्या डोळ्यांनी दर्शन होते.

आकार जेमतेम एक किलोमीटर इतका
या धूमकेतूचा प्रत्यक्ष आकार जेमतेम एक किलोमीटर एवढा आहे. मात्र सूर्याच्या जवळ (खरं तर सूर्याला वळसा घालून जात असल्याने) या धूमकेतूवरील बर्फ वितळल्याने त्याला शेपूट तयार झाले आहे. धूमकेतूवरील बर्फ – धूळ वगैरे लक्षात घेता तो फिक्कट हिरव्या रंगात दिसत आहे. त्यामुळे बर्‍याच वर्षांनी सूर्यमालेला भेट देणार्‍या या पाहुण्याला बघण्याची संधी दवडू नका.

पृथ्वीच्या जवळ येणार्‍या या धूमकेतूची अपेक्षित तीव्रता सध्या फारच कमी आहे. त्यात त्याची म्हणावी तशी प्रगती झालेली दिसत नाही. काल-परवा या धूमकेतूचे निरीक्षण केले, तर त्याची तीव्रता कमी दिसली, म्हणजेच अपेक्षित तीव्रता 5 इतकी दिसली.

                                      – अनिरुद्ध बोपर्डीकर सदस्य, द वर्चटाईल ग्रुप, नगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news