कोल्हापूर : मोहसीन मुल्ला; दोन दिवसांपूर्वी बंगळूर शहरात मुसळधार पाऊस पडला. तसेच महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही ढगफुटीच्या घटना घडल्या. (ग्लोबल वॉर्मिंग) अतिवृष्टीच्या घटनांची संख्या महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात वाढत असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. 1950 ते 2015 या काळात अतिवृष्टीच्या घटनांत तिप्पट वाढ झाली असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजीच्या संशोधनात दिसून आले आहे. (ग्लोबल वॉर्मिंग)
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल, यामुळे अचानक पाऊस कोसळण्याच्या घटनांत (Extreme Climatic Event)वाढ होईल, हे संशोधकांनी वारंवार सांगितलेले आहे. दुष्काळ, उष्णतेची किंवा थंडीची तीव्र लाट, काही भागांत कमी वेळात पडणारा जास्त पाऊस, अशा घटना सतत घडताना दिसतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजीचे सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्चचे संशोधक एम. के. रॉक्सी, इतर काही संस्थांतील संशोधक सुबिमल घोष, अमेय पाठक, आर. अतुल्य, मिलिंद मुजुमदार, रघू मुर्तुगडे, पास्कल टेरी आणि एम. राजीवन यांनी मध्य भारतातील अतिपावसाच्या घटनांचा अभ्यास केला आहे. हा रिसर्च पेपर नेचर कम्युनिकेश या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
मध्या भारतात एकूण पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे; शिवाय बंगालच्या उपसागरात तयार होणार्या कमी दाबाच्या पट्ट्यांची संख्याही कमी झालेली आहे, त्यामुळे तीव्र पावसाच्या घटना का घडत आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला. या संशोधनात असे दिसून आले आहे की, उत्तर अरबी समुद्रातील तापमान वाढल्याने येथून येणार्या मान्सूनच्या वार्यांत चढ-उतार होत आहेत. या भागात पावसासाठी आवश्यक असणारी आर्द्रता ही अरबी समुद्रातून येते, असे या संशोधनात म्हटले आहे.
उत्तर अरबी समुद्रातील वाढत्या तापमानवाढीला संशोधकांनी मानवी हस्तक्षेपामुळे कार्बन डायऑक्साईडचे जे उत्सर्जन होते, त्याला जबाबदार धरले आहे. हे बदल मान्सूनचे वारे आणि आर्द्रता यांच्यातील मोठ्या प्रमाणावरील चढ-उतारांना कारणीभूत ठरत आहेत. अशा प्रकारचा पाऊस सलग तीन दिवस पडतो, असे संशोधकांनी नमूद केले आहे. मुंबईतील 2005 आणि 2017 मधील महापूर अशा तीव्र पावसांमुळे आला होता, असे या रिसर्च पेपरमध्ये म्हटले आहे.
गेल्या दशकात पुराच्या घटनांमुळे जगभरात 30 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे या संशोधनात म्हटले आहे. यातील 10 टक्के म्हणजे 3 अब्ज डॉलरचे नुकसान भारतात झालेले आहे. तर 1950 ते 2015 या काळात भारतात एकूण 268 पुराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. या घटनांत 69 हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर 1 कोटी 70 लाख लोक बेघर झाले. महापुरांच्या घटनांनी प्रभावित होणार्या नागरिकांची संख्या 82 कोटी 50 लाख इतकी आहे.
संशोधकांनी या घटना गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, आसाम, मेघालय, गोवा, उत्तर कर्नाटक, दक्षिण केरळ या राज्यांत नोंदवल्या आहेत.