कोल्हापूर गोकुळ : नेत्यांसमोर ‘स्वीकृत’ निवडीचे आव्हान | पुढारी

कोल्हापूर गोकुळ : नेत्यांसमोर ‘स्वीकृत’ निवडीचे आव्हान

कोल्हापूर : विकास कांबळे

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीनंतर सत्कार समारंभात सर्व नेते असतानाच ‘स्वीकृत’ सदस्य निवडीवरून उडालेला धुरळा ‘गोकुळ’ जिंकणार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र अजूनही शांत करण्यात यश आले नाही.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत तडजोडीचे राजकारण करत असताना ‘स्वीकृत’साठी महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी काहीजणांना ‘स्वीकृत’चा शब्द दिल्याचे समजते. अशा परिस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची मुंबईतून स्वीकृत सदस्य म्हणून निवड जाहीर झाल्याने नेत्यांची अडचण झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवड होऊनही मुरलीधर जाधव यांच्यावर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत अपवाद वगळता शिवसेनेची ताकद मिळाल्यामुळे पालकमंत्री पाटील यांना महाडिक यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यात यश आले. या निवडणुकीत शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांना मात्र धक्का बसला. त्यांचे चिरंजीव वीरेंद्रसिंह मंडलिक तसेच राष्ट्रवादीचे चंदगडचे आ. राजेश पाटील यांच्या पत्नी यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीजणांना स्वीकृत सदस्य करण्याबाबत शब्द दिल्याचे बोलले जाते. त्यानंतर स्वीकृत सदस्य निवडीची चर्चा सुरू होते न होते तोच शिवसनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड जाहीर झाली. याला एक महिना होऊन गेला तरीदेखील जाधव यांना संचालकांच्या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. शिवसेनेच्या संचालकांनीदेखील संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय कधी उपस्थित केला नाही. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनाच टार्गेट केल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

Back to top button