शिवसेनेचा राष्ट्रवादीवर बाण | पुढारी

शिवसेनेचा राष्ट्रवादीवर बाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणुकीआधीच प्रभागरचनेवरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. प्रामुख्याने हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने प्रभागरचनेत डावलल्याचा आरोप करीत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. महापालिकेची अंतिम प्रभागरचना गत आठवड्यात जाहीर झाली. ही रचना राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वाधिक अनुकूल असल्याचे चित्र आहे. मात्र, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेला या रचनेत फारसा फायदा होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यावरून आता हडपसर मतदारसंघातील शिवसेनेने थेट उघड नाराजी व्यक्त केली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक होते, तसेच दोन वेळा आमदार, एकवेळा खासदार सेनेचा असतानाही या मतदारसंघातील प्रभागरचना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसाठी अनुकूल करण्यात आली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी केला आहे.

तसेच राष्ट्रवादीसमवेत निवडणूक लढता मैत्रीपूर्ण करू असे स्पष्ट करीत त्यांनी हडपसरमध्ये महाविकास आघाडीला सुरुंग लावला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार तसेच राष्ट्रवादीच्याच विद्यमान शहराध्यक्षांनी हस्तक्षेप करून सेनेला अडचणीची आणि राष्ट्रवादीला अनुकूल होईल अशा पध्दतीची प्रभागरचनेची खेळी केली असल्याचा दावा भागनिरे यांच्यासह शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे हडपसर आणि परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला असून आम्ही वेळ प्रसंगी राष्ट्रवादीच्या समोरून लढू असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.
एकिकडे महापालिकेत भाजपला पुन्हा सत्तेत येऊ न देण्याचा राष्ट्रवादीचा मनोदय आहे. मात्र, दुसरीकडे प्रभागरचनेवरून आता महाविकास आघाडीतच बेबनाव सुरू झाला आहे. काँग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिलेल्या आहे. त्यामुळे किमान राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपला टक्कर देईल असे चित्र होते. मात्र, हडपसरमध्येच सेनेने थेट नाराजीचा बाण चालविल्याने इतर मतदारसंघातही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button