पुणे : पुढारी वृत्तसेवा
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या विरोधात शहरातील नाट्य कलाकारांनी व बॅकस्टेज कलाकार, कर्मचार्यांनी एल्गार पुकारला आहे. या विरोधात 19 मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या व कलाकारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. सध्या अस्तित्वात असलेले रंगमंदिर पाडून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये तीन नाट्यगृहे, कलादालन, पार्किंग अशी व्यवस्था असेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
या पुनर्विकासाला कला क्षेत्रासह विविध संस्था आणि संघटनांकडून विरोध होत आहे. याचाच एक भाग म्हणून नाट्य कलावंत, विविध संस्था, नाट्यकर्मी, बॅकस्टेज कलाकार, कर्मचार्यांची मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे बैठक झाली. या बैठकीला 70 ते 75 जण उपस्थित होते. यावेळी पुनर्विकासाला विरोध करण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन यांनी दिली.
आधी इतरत्र देखभाल दुरुस्ती करा
शहरातील अनेक नाट्यगृहांची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती होत नाही. वारंवार निधीचे कारण पुढे केले जाते. तसेच अनेक नाट्यगृहांची व सभागृहांची कामे अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेली आहेत. महापालिका प्रशासनाने अस्तित्वात असलेल्या नाट्यगृहांची देखभाल दुरुस्ती आणि रखडलेली कामे पूर्ण करण्याकडे प्रथम लक्ष द्यावे. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा विचार करावा, अशी मागणी एकमुखाने बैठकीत करण्यात आल्याचेही महाजन यांनी सांगितले.
हे ही वाचा :