व्यावसायिक पदवी प्रवेश प्रक्रिया एकाचवेळी? १५ दिवसांत माहिती सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश | पुढारी

व्यावसायिक पदवी प्रवेश प्रक्रिया एकाचवेळी? १५ दिवसांत माहिती सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्यात एकाच वेळी राबविण्याबाबतची माहिती पंधरा दिवसांत सादर करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमांची प्रक्रिया राज्यात एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. सीईटी सेलकडून 15 सीईटी परीक्षांच्या आधारे विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याचा आरोप असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन्स्टिट्यूट्स इन रूरल एरिया या संघटनेकडून करण्यात आला.
व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया एकसारखी करण्याबाबतचे निवेदनही दोनदा सीईटी सेलला देण्यात आले. या निवेदनाद्वारे अभियांत्रिकी, कृषी, विधी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश फेरी एकाच वेळेस समुपदेशन फेरीसह राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे पदविका व पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशाची अंतिम तारीख; तसेच इयत्ता बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.
‘गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारने याबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संघटनेने याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत संघटनेने दिलेल्या निवेदनांचा विचार करून 15 दिवसांच्या आत एकसारखी प्रवेशप्रक्रिया करण्याबाबत निर्णय कळवावा; तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती संघटनेला द्यावी,’ असे आदेश न्यायालयाने दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले.
हेही वाचा

राज्यातील आदर्श प्रकल्पाच्या शाळांत बांधणार नव्या वर्गखोल्या

Devasahayam Pillai : तामिळनाडूच्या देवसहायम् पिल्लई यांना पोप यांच्याकडून संतपद बहाल!

Corbevax : १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठीच्या कॉर्बेवॅक्स लसीच्या किंमतीत मोठी कपात

Back to top button