पुणे : बाजार समिती संघावर महाविकास आघाडीचे वर्चस्व ; २१ पैकी १७ जागांवर विजय | पुढारी

पुणे : बाजार समिती संघावर महाविकास आघाडीचे वर्चस्व ; २१ पैकी १७ जागांवर विजय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ या राज्यातील बाजार समितीच्या शिखर संस्थेवर महाविकास आघाडीने २१ पैकी १७ जागांवर विजयी मिळविला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ९ जागांवर त्या खालोखाल काँग्रेस ४, शिवसेनेने ४ जागांवर विजय मिळविला आहे. भारतीय जनता पक्षानेही ४ जागा जिंकत पूर्वीच्या तुलनेत आपले संख्याबळ वाढविले आहे.

निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून एकूण ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच सर्वसाधारण गटात मतमोजणीत समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून दोन संचालक विजयी झाले आहेत. त्यामध्ये मनिष दळवी-सिंधुदुर्ग आणि दामोदर नवपुते-औरंगाबाद या दोन संचालकांचा समावेश आहे. विजयाची घोषणा होताच शिवसेनेच्या विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.

राज्य बाजार समिती संघाच्या निवडणुकीसाठी २१ मार्च २०१८ रोजी मतदान झाले होते. मात्र, आर्थिक दुर्बल घटकांना ९७ व्या घटना दुरुस्तीमध्ये वगळल्याने ही बाब न्यायप्रविष्ट होऊन मतमोजणीस स्थगिती देण्यात आली होती. मात्र, याबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्यानंतर मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार साखर संकुल येथील कार्यालयात सीलबंद ठेवण्यात आलेल्या मतपेट्या उमेदवारांसमक्ष रविवारी (दि.२७) निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) नारायण आघाव यांनी उघडल्या आणि मतमोजणीस सुरुवात केली. दुपारी मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी निवडणूक निकाल जाहीर केला.

बिनविरोध संचालक

सर्वसाधारण मतदार संघ : ठाणे-रायगड : अनंतराव देशमुख (हातनोली, ता. खालापूर, जि. रायगड), अहमदनगर-नाशिक मतदार संघ – प्रविणकुमार नाहाटा (लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), पुणे-सातारा मतदार संघ – रमेश शिंदे (कोपर्डे, ता. खंडाळा, जि. सातारा), सोलापूर-सांगली-कोल्हापूर मतदार संघ – जयवंतराव जगताप (टेभुर्णी, ता. करमाळा, जि. सोलापूर), बीड-उस्मानाबाद : अशोकराव डक (सोन्नाथडी, ता. माजलगांव, जि. बीड), अकोला-बुलढाणा : सेवकराम ताथोड (कसुरा, ता. बाळापुर, जि. अकोला), नागपूर-वर्धा : संजय कामनापुरे (दापोरी-पिंपळगांव लुटे, ता. देवळी, जि.वर्धा).

अन्य विजयी उमेदवार कसांत मिळालेली मते :

सर्वसाधारण मतदारसंघ : मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ – चिठ्ठी काढून विजयी – मनिष दळवी (होडवडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग), धुळे-जळगांव, नंदुरबार मतदारसंघ -पोपटराव सोनवणे ( ११ ) (इंदवे, ता. साखरी, जि. धुळे), औरंगाबाद-जालना- चिठ्ठी काढून विजयी – दामोधर नवपुते (सिडको-औरंगाबाद), परभणी-हिंगोली मतदारसंघ – अंकुश आहेर ( ६ ) (आजरसोंडा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली), नांदेड-लातूर मतदारसंघ- संतोष सोमवंशी ( ५ ) (धानोरा, ता. औसा, जि. लातुर), अमरावती-वाशीम मतदार संघ- ज्ञानेश्वर नागमोते ( ९) (भातकुली, जि. अमरावती), यवतमाळ मतदारसंघ- आनंदराव जगताप-( ८)  (परसोडी, ता. कळंब, जि. यवतमाळ), भंडारा-गोंदिया- केशवराव मानकर ( ६) (आमगांव, जि. गोंदिया), गडचिरोली-चंदपूर-द दिनेश चोखारे ( ८) (ताडाळी, ता. जि. चंद्रपूर).

महिला राखीव मतदारसंघ (दोन जागा) :

इंदुताई गुळवे- १५० मते (नाशिक), रंजना कांडेलकर १४१ मते (निमखेडी-मुक्ताईनगर, जि. जळगांव),

अनुसुचित जाती/जमाती मतदारसंघ (एक जागा) :

बाबाराव पाटील १४८ मते (तिष्टी, ता. कळमेश्वर, जि.नागपूर),

इतर मागासवर्गीय राखीव (एक जागा) :

संदीप काळे १४५ मते (तळेगांव रोड, आर्वी, जि. वर्धा)

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग (एक जागा) :

पंढरीनाथ थोरे १६५ मते (मरळगोई, ता. निफाड, जि. नाशिक)

हेही वाचलंत का ? 

Back to top button