भिगवण : भरत मल्लाव
जगभरातून नामशेष होत चाललेल्या गोड्या पाण्यातील महाशीर अर्थात देवमाश्यांच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला वेग आला आहे. टाटा पॉवर, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे, भिगवण रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने या माश्यांचे मत्स्यबीज प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या मदनवाडी तलावात सोडण्यात आले.
भारतासह थायलंड, मलेशिया आदी देशांत दैवी महत्त्व असलेल्या तसेच मत्स्य क्रीडा खेळात महत्त्वाचा मानला जाणारा हा मासा 80 च्या दशकापासून दुर्मीळ होत चालला होता. या प्रजातीच्या पुनरुज्जीवनासाठी मत्स्यप्रमींनी पुढाकार घेतला असून, त्याअंतर्गतच हा उपक्रम घेण्यात आला.
या मोहिमेमुळे नामशेष झालेले महाशीर मासे पुन्हा नदी, तलाव, धरणात काही प्रमाणात दिसणार आहेत. पूर्वी भारतात या माश्यांचे अस्तित्व होते. विशेषतः इंद्रायणी नदीत हे मासे आढळत होते. देहूत आलेले भाविक इंद्रायणी नदीपात्रातल्या या माश्यांचे दर्शन घेतल्याशिवाय माघारी परतत नसत, एवढी श्रद्धा या माश्यांवर होती. मात्र, प्रदूषण व इतर अनेक कारणांनी हे मासे भारतासह जगातून नामशेष होत गेले.
अँग्लींगच्या गेममध्ये चपळ व सामर्थ्यवान असलेला महाशीर आपल्या गळाला लागावा म्हणून अनेक जण तासन् तास बसतात. गळाला हा मासा लागला की, तो किती मोठा आहे, त्याचे वजन किती आहे हे पाहून परत त्याला सोडले जाते. हा खेळ अतिशय गंमतीदार मानला जातो. या माश्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाला उपयुक्त असून, तीलापिया व विनाशकारी माश्यांच्या प्रजाती नियंत्रणात ठेवण्याचे कामही हा मासा करतो, चवीलाही हा मासा इतर माश्यांपेक्षा अधिक चांगला असल्याने त्याला फूड फिश म्हणून मोठी मागणी आहे.
हे मासे नामशेष झाल्यानंतर टाटा पॉवर हाऊसच्यावतीने या माश्यांची पैदास करण्यावर आधुनिक पद्धतीने प्रयत्न केले गेले असून, दरवर्षी लाखो मत्स्यबीज पैदास करून ते तलाव, धरण, नदीपात्रात सोडले जात आहेत. या माश्यांचे संगोपन व्यवस्थित होण्यासाठी विशेष प्रयत्न असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ व या माश्यांच्या पैदासीबाबत महत्त्वाचा वाटा असणारे शशांक ओगले यांनी सांगितले. हा मासा सात- आठ फूट लांब व वजनाने 60, 70 ते 80 किलोपर्यंत वाढू शकतो, असेही ओगले म्हणाले. या माशाला पाण्यातील वाघीण अशीही उपमा दिली जाते. मदनवाडी तलावात या माश्यांचे मत्स्यबीज सोडण्यासाठी शशांक ओगले, आनंद अस्वले, रश्मी अस्वले, कीर्ती मोहरीर, भालचंद्र लेले, सूर्यकांत पुणे, धनंजय मतुरे, अनिश होले, अरुणा ओगले, श्रुती अनित, अनेत सोहम तसेच भिगवण रोटरी अध्यक्ष संजय खाडे, सचिन बोगावत ड. पांडुरंग जगताप, औदुंबर हुलगे आदी उपस्थित होते.
विदेशी पर्यटक तसेच अँग्लर्सचा महाशीर हा आवडता मासा आहे.कावेरी, शरयू,रामगंगा नदीपात्रातील या देवमाश्यांचे अँग्लींग प्रसिध्द आहे. परदेशी पर्यटकांत गेम फिश म्हणून या माश्यांची ओळख आहे. केवळ या खेळासाठी जगभरातील लाखो परदेशी पर्यटकांचे पाय भारतात वळतात.