अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडोअर | पुढारी

अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडोअर

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : अवयव प्रत्यारोपणासाठी पुन्हा एकदा गुरुवारी शहरात सोलापूर ते पुणे ग्रीन कॉरिडोअर करण्यात आले. सामाजिक भावनेतून पतीने दिलेल्या संमतीनुसार मेंदू मृत झालेल्या (ब्रेन डेथ) येथील एका महिलेच्या दोन किडनी व दोन डोळे काढण्यात आले. त्यापैकी एक किडनी ग्रीन कॉरिडोअर करून पुण्याच्या रूबी हॉस्पिटलला पाठविण्यात आली.

उर्वरित एका किडनीची सोलापुरातच प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. तसेच दोन डोळे तोष्णीवाल आय बँकेत जमा करण्यात आले. सुमारे अडीच तासांत किडनी सोलापुरात एअर अ‍ॅम्ब्युलन्सने पुण्याला रूबी हॉस्पिटलमध्ये पोहोच झाली आणि तेथे यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

शहरातील शारदा चंद्रकांत निली यांना आजारपणावर उपचारासाठी कुंभारी येथील अश्‍विनी हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मेंदूत गाठ फुटल्याने त्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण त्यांचा मेंदू मृत झाला होता. याबाबत डॉक्टरांनी पती चंद्रकांत आणि त्यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली होती.

यामुळे चंद्रकांत यांनी निली यांचा ब्रेन डेथ झाला असला तरी त्यांचे अवयव दान करून दुसर्‍या रुग्णांचे प्राण वाचविण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात डॉक्टरांना त्यांनी कळविले.

त्यांनी दिलेल्या संमतीनुसार अश्‍विनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून निली यांचे अवयव काढून दुसर्‍याला प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. यामध्ये किडनीचे प्रत्यारोपण काही तासातच होणे गरजेचे असते. त्यासाठी जिल्हाधिकारी तसेच पोलिस प्रशासनाला कळविले. त्यानुसार हॉस्पिटल असलेल्या कुंभारीपासून पुण्याच्या रूबी हॉस्पिटल पर्यंत ग्रीन कॉरिडोअर करण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी मेंदू मृत शारदा निली यांच्यावर शस्त्रक्रिया करून दोन किडनी व दोन डोळे काढण्यात आले. त्यापैकी एक किडनी पुणे येथील रूबी हॉस्पीटल येथील डॉ. मनोज श्रीवास्तव व त्यांच्या सहकार्‍यांनी ग्रीन कॉरीडोअर करून अ‍ॅम्ब्युलन्समधून नेली. तर दुसरी किडीन कुंभारी येथील अश्‍विनी हॉस्पीटल येथील बार्शीच्या रुग्णांस प्रत्यारोपण करण्यात आली. यामुळे दोन जीव वाचले.

शारदा निली यांचे पती चंद्रकांत निली, त्यांचा मुलगा, भाऊ यांनी सामाजिक भावनेतून घेतलेल्या निर्णयाचे शहरात कौतुक होत आहे. ही शस्त्रक्रिया व किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी केल्या बद्दलल अश्‍विनी हॉस्पिटलचे कार्यकारी विश्‍वस्त बिपीन पटेल, भारती पटेल, मेहूल पटेल, अधिष्ठाता डॉ. सुहास कुलकर्णी, उपअधिष्ठाता डॉ. सचिन मंबुरे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. गुणवंत नस्के, आरोग्य अधिक्षक डॉ. सिध्देश्‍वर करजखेडे यांनी अभिनंदन केले.

Back to top button