मोहोळमध्ये मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड; 12 गाड्या हस्तगत | पुढारी

मोहोळमध्ये मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड; 12 गाड्या हस्तगत

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा

दुचाकी गाड्या चोरून विकणार्‍या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश केला. मोहोळ पोलिसांच्या पथकाने टोळीतील तिघांना अटक केली. राहुल विष्णू दांडगे (वय 24), सागर चांगदेव अंकुश (वय), सोहेल तुराब शेख (24, सर्व रा. अनगर, ता. मोहोळ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या चोरीच्या 12 मोटारसायकल जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.

गेल्या 26 नोव्हेंबर रोजी मोहोळ पोलिसांचे पथक यावली, अनगर या रस्त्यावर रात्रपाळीच्या गस्तीवर होते. त्यावेळी तीन व्यक्ती एका विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर संशयितरीत्या फिरत असताना पोलिसांनी अडविले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला; मात्र ते तिघेजण भरधाव वेगाने पळून जाऊ लागले.

त्यामुळे मोहोळ पोलिसांनी लोकनेते कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या गाडीची चौकशी केली, ती गाडी चोरीची असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्या तिघांनी राहुल दांडगे, सागर अंकुश, सोहेल तुराब शेख (सरर्व रा. अनगर, ता. मोहोळ) अशी नावे सांगितली. अधिक चौकशी करता त्यांनी मोटारसायकल चोरत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्या ताब्यातून एकूण चोरीच्या 12 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्यापैकी मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्हे तर माढा व पंढरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेदेखील केल्याचे त्यांनी कबुल केले.

निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. सचिन माने, पोलिस नाईक अमोल घोळवे, पोलिस नाईक प्रवीण साठे, पोलिस अंमलदार सिध्दनाथ मोरे, महिला पोलिस नाईक अनुसया बंडगर यांच्या पथकाने मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड केली.

हेही वाचा

Back to top button