दिंडी चालली | पुढारी

दिंडी चालली

पालखी सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी वारकरी दिंडीसह पंढरपूरला जात असत, हे आपण पहिल्याच भागात पाहिले. अजूनही अनेक परंपरांच्या दिंड्या पंढरपूरला जातात. अशाच काही दिंड्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. अंमळनेरकर महाराजांची दिंडी खानदेशातील जळगावजवळील अमळनेर येथे रामानुज वैष्णव संप्रदायातील अंमळनेरकर महाराजांची गादी आहे. या गादीचे मूळपुरुष सखाराम महाराज हे रामानुज वैष्णव संप्रदायी असून, विठ्ठलभक्त होते. आषाढी वारीला अमळनेर येथून पायी पंढरपूरला जाऊन चातुर्मासात तिथे चार महिने मुक्कामी राहणे, अशी ही परंपरा आहे. कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यावर पुन्हा तेथून ते आळंदीला जातात.
आषाढी वारीसाठी दिंडीचे प्रस्थान अंमळनेर येथील वाडी मंदिरातून पहाटे पाच वाजता होते. त्यावेळी पारंपरिक अभंग म्हटले जातात.

त्यानंतर महाराज तेथून निघून तुळशी मळ्यात येतात. हातामध्ये वीणा व डोक्यावर घोंगडी असा महाराजांचा पोशाख असतो. मूळ पुरुष पंढरपूरला जाताना घराचा मोह नको म्हणून आपल्या झोपडीला आग लावून जात असत. याचे स्मरण म्हणून अजूनही एक छोटी प्रतीकात्मक झोपडी करून ती जाळली जाते. त्यानंतर दिंडी पंढरपूरला निघते. सर्वात पुढे घोडा, मागे झेंडेकरी, त्यांच्या मागे टाळकरी, त्यांच्या मागे देव घेतलेले तिघेजण – वीणेकर्‍यांच्या पाठीवर मोठी विठ्ठल मूर्ती म्हणजेच मोठे देव, एका व्यक्तीच्या पाठीवर इतर देव व एका व्यक्तीच्या पाठीवर ज्ञानेश्‍वरी असते. त्यांच्या पाठीमागे महिला भाविक चालतात. वाटेत प्रत्येक ठिकाणी सकाळी देवांची पूजा, तुळशी अर्चना, आरती, प्रसाद वाटप होतो. त्यानंतर वाटचालीला सुरुवात होते. दुपारी पुन्हा देव बाहेर काढून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर सर्वांची पंगत होते.

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दिंडी पैठणला पोहोचते. इथे सर्वांचे गोदावरी स्नान होते. त्यानंतर नाथ महाराजांच्या समाधीला अंमळनेरकर महाराजांच्या हस्ते अभिषेक होतो. नाथ महाराजांच्या घरी अंमळनेरकर महाराजांना प्रसादाचे भोजन होते. आषाढ शुद्ध नवमी म्हणजे कांदेनवमी या दिवशी दिंडी गुरसाळे येथे आलेली असते. चातुर्मासाचे चार महिने कांदा, लसूण वर्ज्य. त्यामुळे कांदा, लसूण खाण्याचा शेवटचा दिवस असतो. यानिमित्त दिंडीमध्ये कांदाभजी बनवण्यात येतात. त्यानंतर दिंडी पंढरपुरात पोहोचते. महाराज वाळवंटात जाऊन चंद्रभागेचे पाणी पायावर घेतात. तेथून पुंडलिक दर्शन व वाळवंटात असलेल्या परंपरेच्या सहा मूळ पुरुषांचे दर्शन घेऊन रात्री उशिरा दिंडी मठामध्ये पोहोचते. मग पौर्णिमेला गोपाळपूरला जाऊन काला होतो.

Back to top button